सुमीतच्या पार्थिवावर मीरा रोड येथे अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 05:23 AM2018-04-14T05:23:16+5:302018-04-14T05:23:16+5:30
वसईतील सुमीत सदानंद कवळी (३२) या गिर्यारोहकाचा उत्तराखंड येथील चैनशील ट्रेक सर करताना हिमवादळात सापडून हायपोथर्मियाने मृत्यू झाल्याची घटना १० एप्रिलला घडली होती.
मुंबई/वसई : वसईतील सुमीत सदानंद कवळी (३२) या गिर्यारोहकाचा उत्तराखंड येथील चैनशील ट्रेक सर करताना हिमवादळात सापडून हायपोथर्मियाने मृत्यू झाल्याची घटना १० एप्रिलला घडली होती. खराब हवामानामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्यामुळे सुमीतचे पार्थिव शरीर मुंबईत तीन दिवसांनंतर आणण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा मीरा रोड येथील व्यंकटेश स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुमीतचे वडील सदानंद कवळी हे डॉक्टर असून त्यांची नुकतीच बायपास सर्जरी झाली आहे. त्यामुळे मुलाच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांनी त्यांच्यापासून काही काळ लपवून ठेवली होती. गुरुवारी पोस्टमार्टेम झाल्यावर शुक्र वारी सुमीतचे पार्थिव डेहराडून येथे आणण्यात आले. त्यानंतर ते दिल्ली व नंतर मुंबईत आणण्यात आले. सुमीतच्या अंत्यसंस्काराला तो राहत असलेल्या वसईतील आगाशी गावातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.