बिल्डरकडून खंडणी मागणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: June 15, 2017 02:35 AM2017-06-15T02:35:01+5:302017-06-15T02:35:01+5:30
अनधिकृत बांधकामप्रकरणी इमारतीमधीलच सात फ्लॅटधारकांनीच तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एका नामांकित
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : अनधिकृत बांधकामप्रकरणी इमारतीमधीलच सात फ्लॅटधारकांनीच तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एका नामांकित बिल्डरने केली आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरारमधील नामांकित बिल्डर आशुतोष जोशी यांच्या मोहक सिटी गृह संकुलातील हे सात फ्लॅटधारक आहेत. बिल्डर आणि फ्लॅटधारक पवन सरकाळे, देवेन कोचरेकर, राजन वझे, राजदीप दळवी, अनिष सावे, जयेश शाह, देवेंद्र गोंडले यांची वसई येथील एका हॉटेलमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी सदर फ्लॅटधारकांनी तक्रारी न करण्यासाठी प्रत्येक २५ लाख रुपये मिळून १ कोटी ७५ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच फ्लॅट विकून आम्ही निघून जाऊ असे फ्लॅटधारकांनी सांगितले होते. त्यावेळी खंडणी देण्यास नकार दिला असता पुढील प्रकल्प होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याची तक्रार जोशी यांनी केली आहे.
तसेच खंडणीसाठी पैसे मागत असल्याची ध्वनीफित आणि व्हिडीओ चित्रीकरणही जोशी यांनी पोलिसांना पुरावा म्हणून सादर केले. त्यानंतर विरार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. ही घटना वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा वसई पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सांगितले. तर आपला गृहप्रकल्प अधिकृत असून सर्व शासकीय परवानग्या घेतलेल्या आहेत. असे असतांना सात जण खंडणीसाठी धमक्या देत होते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बनावट कागदपत्रे तयार करून इमारती बांधल्याप्रकरणी वसई विरार परिसरात दोनशेहून अधिक बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यातील अनेक जण तुरुंगात जाऊन आले असून काही जण अद्याप तुरुंगात आहेत. तर खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या बिल्डरांची माहिती अधिकारात माहिती मागवून बिल्डरकडून खंडणी घेणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे.
त्यातच बिल्डरांना धमकावून मागितल्याप्रकरणी डॉ. अनिल यादव यांच्याविरोधात खंडणीचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या डॉ. यादव गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यानंतर गेल्याच आठवड्यात विरार पोलिसांनी एका खंडणी प्रकरणी महिला पत्रकार ज्योती तिवारीसह चार जणांना अटक केली होती.
काय आहे प्रकरण
जोशी यांच्या भागीदारीत असलेल्या व्ही. एस. एंटरप्राईझेस या कंपनीने विरार पूर्वेला पाच विंगच्या इमारती बांधल्या आहेत. यातील बी विंगमधील फ्लॅटधारक आणि बिल्डर यांच्यात वाद सुरु आहे.
तेरा फ्लॅटधारकांनी बांधकामाप्रकरणी विविध विभागाकडून माहिती मागवली होती. त्यात अनियमितता असल्याच्या त्यांचा आरोप असल्याने त्यांनी विविध शासकीय विभागात बिल्डरविरोधात तक्रारी केल्या आहेत.
याप्रकरणी जोशी यांची सदर फ्लॅटधारकांशी २२ डिसेंबर २०१५ रोजी जोशी यांच्या कार्यालयात बैठकही झाली होती. त्यावेळी कोणताही तोडगा न निघाल्याने बिल्डर आणि फ्लॅटधारकांमधील वाद चिघळला होता.