पाच अनधिकृत शाळांविरोधात गुन्हा; शिक्षण विभागाच्या आदेशाचा अवमान केल्याने कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 01:11 AM2019-12-12T01:11:44+5:302019-12-12T01:11:48+5:30
यापूर्वी तीन शाळांविरोधात गुन्हा
नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील अनधिकृत शाळा बंद करण्याच्या उद्देशाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार नालासोपारा पूर्वेकडील परिसरातील चार आणि वसई पूर्वेकडील कामण विभागातील १ अशा एकूण पाच शाळेच्या संस्थाचालकांना गट शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली होती. पण या संस्थांनी शिक्षण विभागाच्या आदेशाचा अपमान केला म्हणून वालीव पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे अनधिकृत शाळा आणि शिक्षण संस्थांचे धाबे दणाणले आहे. यापूर्वी शनिवारी तुळींज पोलीस ठाण्यात तीन शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वसई पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी माधवी चेतन तांडेल (४१) यांनी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांना शाळा बंद करण्याबाबत नोटीस बजावली. तरीही नालासोपारा पूर्वेकडील धानीवबाग येथील शारदा एज्युकेशन ट्रस्टची हिंदी माध्यमाची श्याम शारदा विद्यामंदिर, त्याच परिसरातील ममता एज्युकेशन ट्रस्टची इंग्रजी माध्यमाची मेट हायस्कूल, हरवटेपाडा येथील माता रामराजी देवी एज्युकेशनल ट्रस्टची इंग्रजी माध्यमाची माता भगवती युगानिर्माण विद्यालय, नवजीवन येथील ओमकार चॅरिटेबल एज्युकेशन ट्रस्टची इंग्रजी माध्यमाची रोजरी इंटरनॅशनल स्कूल आणि वसई पूर्वेकडील कामण येथील चिंचोटी परिसरातील गवळीपाड्यातील पंडित एस.आर.त्रिपाठी शिक्षण प्रसारक मंडळाची इंग्रजी माध्यमाची वन नेस्ट इंग्लिश हायस्कूल या पाचही शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर शिक्षण संस्थाचालकांना नोटीस बजावण्यात आली. तरीही नमूद शाळांच्या संस्थाचालकांनी शिक्षण विभागाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून माधवी तांडेल यांनी मंगळवारी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.
शाळा संस्थापकाने घातला शिक्षण अधिकाऱ्यांसोबत वाद
विरार : वसईतील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यास गेलेल्या शिक्षण विस्तार अधिकाºयालाच शाळा संस्थापकाने अडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अधिकाºयाने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बी.के. यादव हायस्कूलच्या संस्थापकावर वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे.
शहरातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यासाठी बुधवारी शिक्षण विस्तारअधिकारी माधव मते आपल्या कर्मचाºयांसह वसईत गेले होते. यावेळी वालीवमधील वाघरालपाडा येथील बी.के.यादव हायस्कूल या शाळेच्या मान्यतेची तसेच कागदपत्रांची तपासणी करण्यास ते गेले असता शाळेचे संस्थापक यादव आणि कर्मचाºयानी वाद घालण्याचा प्रयत्न केला. तसेच या अधिकाºयांना कारवाई करू दिली नाही.
माधव मते यांनी याप्रकरणी बी.के.यादव हायस्कूलचे संस्थापक यादव यांच्याविरोधात वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास सुरू आहे.