केळव्यात वधुपित्यासह चौघा जणांविरोधात गुन्हा, आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:03 AM2021-05-10T10:03:50+5:302021-05-10T10:05:33+5:30
पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.
पालघर : केळवे येथील एका रिसॉर्टमध्ये विवाहप्रसंगी परवानगीपेक्षा जास्त लोकांचा सहभाग आढळून आल्याने केळवे सागरी पोलिसांनी वधुपिता चंद्रप्रकाश जैन, रिसॉर्ट मालक, कॅटरर्स यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या मनाई आदेशाचा भंग करून सफाळे येथील वधुपिता चंद्रकांत घेरीलाल जैन यांनी आपल्या मुलीच्या हळदी समारंभासाठी केळवा सागरी पोलिसांकडून २५ लोकांची परवानगी घेतली होती. हा समारंभ केळवे येथील एका रिसॉर्टमध्ये शनिवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता.
संबंधित रिसॉर्टवर हा समारंभ पार पडत असताना प्रत्यक्षात मात्र जास्त लोकांचा सहभाग आढळला. या प्रकरणी केळवे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी दिनकर मोढवे यांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांना २५ हजारांचा दंड ठोठावला. यावेळी वधुपिता, रिसॉर्ट मालक, पुनीत कॅटरर्सचे मालक, मंडप डेकोरेटर्स या चार लोकांविरोधात शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जयदीप सांबरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस नाईक शिरसाट हे करीत आहेत.
लग्नसमारंभांवर बडगा
राजस्थान येथे लग्नसमारंभास गेलेले जिल्ह्यातील अनेक जण कोरोनाबाधित झाले होते. यानंतर लग्नसमारंभात गर्दी करणाऱ्यांवर, वर-वधुपिता, कॅटरर्स, डेकोरेटर्स, रिसॉर्ट मालकांविरोधात कारवाईचा बडगा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी उचलला आहे. शिरगाव, नांदगाव, सातपाटी, उमरोली, माकूणसार आदी भागांतील लग्न समारंभांवरही कारवाई झाली होती.