अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे
By admin | Published: April 26, 2017 11:32 PM2017-04-26T23:32:14+5:302017-04-26T23:32:14+5:30
अवैध रित्या सावकारी करणाऱ्या बोईसर येथील दोन सावकाराच्या कार्यालयावर पालघर जिल्हा उपनिबंधक संजय राऊत ह्यांनी धाड घालून त्यांच्या विरोधात बोईसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केले आहेत.
पालघर/बोईसर : अवैध रित्या सावकारी करणाऱ्या बोईसर येथील दोन सावकाराच्या कार्यालयावर पालघर जिल्हा उपनिबंधक संजय राऊत ह्यांनी धाड घालून त्यांच्या विरोधात बोईसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केले आहेत.
राज्यात सावकारांच्या कर्जाच्या ओङया खाली दबून शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत असल्याच्या घटना वाढीस लागल्याने केंद्र शासनाने राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँका मार्फत पतपुरवठ्या संदर्भात विविध योजना जाहीर केल्या असून लोकांनी शक्यतो राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था मार्फत कर्ज घ्यावे असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळे बँकांचा कडून कर्ज घेणे शक्य न झाल्यास परवानाधारक सावकारा कडून तारण व बिनतारण कर्ज पर्याय शासन नियमानुसार उपलब्ध करून देण्यात आले आहे.
बोईसर मध्ये बेकायदेशीररित्या भरमसाठ व्याज आकारून काही लोक गरजवंत लोकांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याची तक्रार राजेश बंडू येवले यांनी मुख्यमंत्र्यांच्या पोर्टल वर केली होती. ती तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर उपनिबांधक राऊत यांच्या नेतृत्वा खाली तालुका उपनिबांधक सुरेश अंधारे, सहनिबंधक वाडा विजय पाटील, मुख्य लिपिक भरत वेखंडे,ई. सह दोन पंचाच्या टीमने बोईसर येथे अवैध सावकारी करणाऱ्या चंद्रसेन कोहिल(प्रभात टेलर्स), व समिर उत्तमलाल शहा (श्री विनायक केमिकल) यांच्या कार्यालयावर धाड घातली. या धाडीत अवैध रित्या सावकारी करीत असल्या बाबत दस्तावेज,कोरे धनादेश, मूल्यवान रोखे, गुप्त व्यवहारा संबंधी लिखाण केलेल्या डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.फिर्यादी म्हणून सुरेश अंधारे यांनी तक्रार दिल्यानंतर महाराष्ट्र सहकारी नियमन अधिनियम २०१४ च्या कलम ३८ अन्वये बोईसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी व्यवसाय बोकाळला असून बोईसर मधील या कारवाईनंतर अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.