Virar Covid Hospital Fire: व्यवस्थापन आणि डॉक्टरांवर विरार दुर्घटनेप्रकरणी गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:35 AM2021-04-25T00:35:54+5:302021-04-25T00:36:44+5:30
आयसीयू सेंटरमध्ये उपाययोजना न केल्याचा आरोप
नालासोपारा : विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवामध्ये १५ निष्पाप रुग्णांना शुक्रवारी पहाटे आपला प्राण गमवावा लागला होता. याप्रकरणी पोलिसांनी अखेर अर्नाळा पोलीस ठाण्यात हॉस्पिटलचे व्यवस्थापक, डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या कलमांन्वये मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
विजय वल्लभ हॉस्पिटलचे व्यवस्थापक दिलीप शहा, बस्तीमल शहा, शैलेश पाठक तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारी यांनी आयसीयू सेंटरमध्ये कोरोना रुग्ण असताना आगीसारखी घटना घडल्यास रुग्णांना अपाय होईल ही पूर्णपणे कल्पना असतानाही उपाययोजना न केल्यामुळे आगीसारखी घटना घडून १५ रुग्णांच्या मृत्यूस आणि इतर रुग्ण जखमी होण्यास कारणीभूत झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्घटनेत जळगावच्या वृद्धाचाही होरपळून मृत्यू
पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम येथील विजय वल्लभ या खासगी कोरोना रुग्णालयात एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत जळगाव शहरातील निवृत्तीनगर येथील नरेंद्र शंकरराव शिंदे यांचाही होरपळून मृत्यू झाला. रुग्णालयाच्या ज्या अतिदक्षता विभागात शुक्रवारी पहाटे आग लागली, तेथेच शिंदे यांच्यावरही उपचार सुरू होते. शिंदे हे पेपर मार्टच्या दुकानात कामाला होते.
दीड वर्षांपूर्वी ते पत्नीसह टिटवाळा येथे वास्तव्याला असलेला मुलगा कार्तिक याच्याकडे गेले. तेथे मुलगा कार्तिक याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर काही दिवसांत नरेंद्र यांनाही लागण झाली. प्रकृती खालावल्याने त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हॉस्पिटलच्या व्यवस्थापक, डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जाबजबाब सुरू असून चौकशी सुरू आहे. अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
- संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन
लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थापनाला धडा शिकवा. राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत. परंतु भविष्यात कुठलेही राजकीय संबंध या चौकशीच्या आड येता कामा नये. मृतांना आणि त्याच्या नातेवाइकांना न्याय मिळालाच पाहिजे व दोषींना शासन झालेच पाहिजे.
- सुदेश चौधरी, माजी नगरसेवक