‘त्या’ बिल्डरांविरुद्ध गुन्हे!
By admin | Published: November 15, 2016 04:08 AM2016-11-15T04:08:45+5:302016-11-15T04:08:45+5:30
वसई तालुक्यातील विरार जवळील आगाशी गावच्या बारीवाडा विभागातील १०० वर्षे जुन्या तिवरांच्या झाडांची प्रचंड कत्तल करून त्या जागेवर भराव घालून बेकायदेशीर चाळी
हितेन नाईक / पालघर
वसई तालुक्यातील विरार जवळील आगाशी गावच्या बारीवाडा विभागातील १०० वर्षे जुन्या तिवरांच्या झाडांची प्रचंड कत्तल करून त्या जागेवर भराव घालून बेकायदेशीर चाळी उभारणाऱ्या बिल्डरविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यानी वसई तहसीलदारांना दिले आहेत.
वसईतील मौजे डबाखार कोल्हापूर आगाशी बारीवाडा विभागात सुमारे अडीच एकर जमिनीवर तिवरांचे घनदाट जंगल होते. आगाशी गावातील महेश यशवंत भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सन २००९ पासून या तिवरांची कत्तल केली असून त्या जागी भराव करून त्यावर बैठ्या चाळी बांधल्या. याबद्दल बारीवाडा ग्रामस्थांनी वारंवार वसईचे उप जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्याशी पत्रवाव्यहार केला. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. परंतु अनिकेत वाडीवकर यांनी गूगल अर्थच्या माध्यमातून सन २००६ , २००९ व २०१६ च्या तिवरांच्या परिस्थिती चे फोटो मिळवून, हे फोटो व माहिती अधिकारात प्राप्त झालेली माहिती यासह उपजिल्हाधिकारी व तहसीलदारां कडे तक्रार दाखल केली. पाठपुरावा करून महसूल खात्यास कारवाई करायला भाग पाडले.
महेश भोईर व साथीदारांनी या तिवरांची कत्तल व त्या जागी माती भराव केल्याचे अहवालात नोंद करून हा अहवाल २० आॅक्टोबर रोजी तहसीलदार यांना सादर करण्यात आला. तहसीलदारांनी दोन दिवसात फौजदारी गुन्हा दाखल होईल असे आश्वासन दिले होते. मात्र आठ दिवस उलटून देखील गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी अभिजित बांगर याना ट्विट करून माहिती दिली. या नंतर बांगर यांनी स्वत: लक्ष घालून वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे याना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.