वसई न्यायालयातून पोलिसांना झटका मारून पळालेल्या आरोपीला साथीदारासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 04:24 PM2022-11-28T16:24:42+5:302022-11-28T16:25:52+5:30

विरारच्या आयसीआयसीआय बँकेच्या खून व दरोड्याच्या प्रकरणातील आरोपी शुक्रवारी दुपारी वसई न्यायालयातून पोलिसांच्या हाताला झटका मारून मित्राच्या मदतीने दुचाकीवरून पळून फरार झाला होता.

Crime branch police arrested the accused and his accomplice who ran away from the Vasai court | वसई न्यायालयातून पोलिसांना झटका मारून पळालेल्या आरोपीला साथीदारासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक

वसई न्यायालयातून पोलिसांना झटका मारून पळालेल्या आरोपीला साथीदारासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक

googlenewsNext

नालासोपारा (मंगेश कराळे) :-

विरारच्या आयसीआयसीआय बँकेच्या खून व दरोड्याच्या प्रकरणातील आरोपी शुक्रवारी दुपारी वसई न्यायालयातून पोलिसांच्या हाताला झटका मारून मित्राच्या मदतीने दुचाकीवरून पळून फरार झाला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस अधिकारी व अंमलदारानी तपास करून फरार झालेल्या आरोपीला मित्रासोबत रविवारी रात्री अटक करण्यात यश आले आहे. पळून जाण्यासाठी वापर केलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास व चौकशीसाठी दोन्ही आरोपी गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडे वर्ग करण्यात आले आहे. 

विरारच्या आयसीआयसीआय बँकेत २९ जुलै २०२१ मध्ये रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी अनिल दुबेने जबरी चोरी करण्याच्या इराद्याने धारधार हत्यारानिशी बँकेत येऊन व्यवस्थापक योगिता चौधरी यांच्या गळ्यावर व इतर ठिकाणी वार करत गंभीर दुखापती करून जीवे ठार मारले होते. तसेच चोरीला विरोध करणाऱ्या रोखपाल श्रद्धा देवरुखकर (३२) यांच्या गळ्यावर, शरीरावर इतर ठिकाणी वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी हत्या आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. आरोपी अनिल दुबे हा तेव्हापासून ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहे. शुक्रवारी आरोपीची तारीख असल्या कारणाने ठाणे जेलमधून वसई न्यायालयात आणण्यात आले होते. आरोपीला बाथरूमला नेण्यात आल्यावर एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा हात झटकून तो न्यायालयाच्या परिसरातून पळून गेला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपी व त्याला मदत करणाऱ्याला पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी पथके तयार करून माहिती मिळाल्यावर आरोपी अनिल दुबे व त्याला मदत करणाऱ्या चांद बादशहा खान या दोघांना नालासोपाऱ्याच्या गौराईपाडा येथून रविवारी रात्री पकडले आहे. आरोपी चांद याच्यावरही चोरीचे ४ गुन्हे दाखल आहेत. 

ठाणे मध्यवर्ती कारागृहात आखला होता प्लान
अनिल व चांद हे दोघेही ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना ओळख झाली होती. अनिलने चांद याला पळून जाण्यासाठी मदत केल्यावर पैसे देतो असे सांगितले होते. चांद याने त्याला होकार देत सुटल्यावर वसईत तारखेला आल्यावर पळून जाण्याचा प्लान आखण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी त्यांनी हा आखलेला प्लान फत्तेही केला होता. 

१) वरिष्ठांच्या आदेशानुसार शोधासाठी पथके तयार करून माहिती मिळाल्यावर आरोपी व त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या असे दोघांना रविवारी रात्री ताब्यात घेऊन अटक केली आहे. - प्रमोद बडाख (पोलीस निरीक्षक, गुन्हे युनिट तीन)

Web Title: Crime branch police arrested the accused and his accomplice who ran away from the Vasai court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.