फटाक्यांच्या कारखान्यावर गुन्हे शाखा पोलिसांचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 11:33 PM2020-11-06T23:33:25+5:302020-11-06T23:33:53+5:30
fire cracker : चंदनसार रोडवरील जुने पोस्ट ऑफिसच्या बाजूला असलेल्या जैन व्हिला या इमारतीत हा बेकायदा कारखाना सुरू हाेता. पाेलिसांना माहिती मिळताच वसई गुन्हे आणि विरार पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी ६.४५ वाजता छापा घातला.
नालासोपारा : विरार पूर्वेतील चंदनसार रोडवरील एका इमारतीत विनापरवाना आपटी बाॅम्ब फटाके बनवणाऱ्या कारखान्यावर वसई गुन्हे शाखा आणि विरार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी एकत्र छापा मारला. पोलिसांनी कारखान्यातून फटाके बनवण्याचे साहित्य, मशिनरी असा १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विरार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
चंदनसार रोडवरील जुने पोस्ट ऑफिसच्या बाजूला असलेल्या जैन व्हिला या इमारतीत हा बेकायदा कारखाना सुरू हाेता. पाेलिसांना माहिती मिळताच वसई गुन्हे आणि विरार पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी ६.४५ वाजता छापा घातला. आरोपी फय्याज मर्चंट (३२), राजकुमार पासवान (३२) आणि रामकुमार निशाद (२४) हे नियमांचे उल्लंघन हा कारखाना चालवत हाेते. या कारखान्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश असतानाही या कारखान्यात ७८ कामगार काम करत असल्याचे पोलिसांना आढळले. याप्रकरणी दोन आरोपींना ४१ ची नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आल्याचे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याप्रकरणी दाेघांना ताब्यात घेऊन ४१ ची नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आल्याचे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दहा लाखांचे साहित्य जप्त
कारखान्यातून सात लाखांच्या सात मशीन, एक लाखाची फटाके पॅकिंगची मशीन, सहा हजार ६०० रुपयांचे ६५ रासायनिक द्रव्याचे पाच लिटरचे कॅन, १३ हजार ६८० रुपयांचे ३० लीटरचे रासायनिक द्रव्याचे २१ कॅन, एक लाखाचे ७० प्लास्टिक कागदाचे रोल, एक लाखाच्या ५८ मार्बल क्रॅशच्या गोण्या, ५० हजारांचे पार्टी पॉप तयार फटाक्यांचे लहान पिशव्यांचे २१ ट्रे असा एकूण १० लाख ७० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.