सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 05:43 PM2024-01-30T17:43:28+5:302024-01-30T17:45:46+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कामगिरी.
मंगेश कराळे,नालासोपारा : स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे भासवून सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
२६ ते २८ सप्टेंबर दरम्यान संतोष ठाकुर यांना आरोपी राम पाटील (खरे नाव रामसिंग देवरा), स्वप्नील हळदनकर, अमोल भोईर, राहुल सिंग (खरे नाव सुरज दुबे) व अरविंद दुबे यांनी विरारच्या ग्लोबल सिटीतील सनसाईटस बिल्डींगमधील सदनिका स्वप्नील हळदनकर याच्या मालकिची असल्याचे भासवले. त्याबदल्यात संतोष ठाकूर यांच्याकडून ७ लाख ८३ हजार ५०० रुपये घेऊन सदनिकेचा ताबा दिला नाही. तसेच सदनिकेसाठी घेतलेले पैसे परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्तालयातील वसई-विरार भागात स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन सामान्य नागरीकांची फसवणुक करणारी टोळी सक्रिय झाली होती. सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीचा शोध घेवुन पायबंद करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
सदर गुन्हयांचे अनुषंगाने युनिट तीनच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हयातील मुख्य आरोपी रामसिंग देवरा (२८) याला २७ जानेवारीला ताब्यात घेतले. अटक आरोपीकडे प्राथमिक तपास केल्यावर अर्नाळा व तुळींज पोलीस ठाण्यातील गुन्हयात पाहिजे आरोपीत असल्याचे निष्पन्न झाले. अटक आरोपीने त्याचे इतर साथीदारांच्या बरोबर आपआपसात संगणमत करुन स्वस्त दरात घर विकत घेऊ इच्छीत सामान्य नागरीकांना हेरुन त्यांची अंदाजे २ कोटी रुपयांची फसवणुक केले असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. उक्त आरोपीविरुद्ध अशाच प्रकारे फसवणुकीचे अर्नाळ्यात ४, तुळींजला १, नालासोपाऱ्यात २ असे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. आरोपी रामसिंगला २ फेब्रुवारीपर्यंत वसई न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे, सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.