जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह सुमारे २०० आंदोलकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 12:54 AM2020-08-20T00:54:39+5:302020-08-20T00:54:48+5:30
हे आंदोलन करताना कुठलीही परवानगी न घेता केल्यामुळे त्यांच्यासह १५० ते २०० कार्यकर्त्यांवर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाडा : भिवंडी-वाडा-मनोर हा खड्डेमय झालेला रस्ता गणेशोत्सवापूर्वी सुस्थितीत करावा, या मागणीसाठी जिजाऊ सामाजिक संघटनेचे संस्थापक आणि पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मंगळवारी कुडूसनाका येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते. हे आंदोलन करताना कुठलीही परवानगी न घेता केल्यामुळे त्यांच्यासह १५० ते २०० कार्यकर्त्यांवर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
वीरेंद्र ठाकरे, विलास पाटील, प्रमिल पाटील, महंमद खान, दीपक पाटील, प्रमोद जाधव, कल्पेश ठाकरे, मितेश भोईर, जयेश जाधव, मयूर पाटील, अविनाश जाधव, साईनाथ जाधव अशी अटक केलेल्या आंदोलकांची नावे आहेत. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्र वारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावरील वाडा ते भिवंडी या दरम्यानचा रस्ता प्रत्येक पावसाळ्यात नादुरु स्त होऊन रस्त्याची चाळण होऊन मोठमोठे खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी आणि अपघात हे नित्याचेच होऊन बसले आहेत. गणपतीचा सण हा दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्तादुरुस्तीबाबत उपाययोजना करण्यात न आल्याने जिजाऊ संघटनेतर्फे कुडूसनाका येथे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी पोलिसांचा आदेश झुगारला होता.
>विनापरवानगी वाहतूक रोखून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी वाडा पोलिसांनी निलेश सांबरे यांच्यासह १५० ते २०० कार्यकर्त्यांवर साथीचा रोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.