तारापूरमधील उद्योगांवर संकट; उत्पादन होणार ठप्प?, बेरोजगारीची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 10:50 PM2020-03-08T22:50:44+5:302020-03-08T22:51:25+5:30
सीईटीपीवर एमपीसीबीची बंदची कारवाई
पंकज राऊत
बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील उद्योगांमधून निघणारे घातक रासायनिक सांडपाणी संकलित करून त्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर (सीईटीपी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई केली आहे. या प्रक्रिया केंद्राचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असले तरी सोमवारी (दि. ९) दुपारी एमपीसीबीच्या तारापूर एन्व्हायरन्मेंट प्रोटेक्शन सोसायटीच्या (टीईपीएस) बोर्ड ऑफ डायरेक्टर यांच्याबरोबर होणाºया बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारवाईमुळे तारापूरमधील शेकडो उद्योगांमधील उत्पादन ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तारापूरमधील या कारवाईमुळे सुमारे दोन लाख कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. एमपीसीबीची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात असली तरी वास्तविक अशी करवाई कधीच होणे गरजेचे होते. त्यामुळे आता उशिरा का होईना केलेल्या कारवाईची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत. मात्र त्याच वेळी या कारवाईमुळे तारापूरमध्ये औद्योगिक भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रांमध्ये लघु, मध्यम व मोठे असे मिळून सुमारे साडेअकराशे उद्योग कार्यरत आहेत. त्यापैकी २५ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमता असलेल्या तारापूरमधील या जुन्या सीईटीपीमध्ये सांडपाणी पाठविणाºया उद्योगांची सदस्य संख्या ६०० च्या वर असून एमआयडीसीमध्ये ४० टक्के पाणी कपातीपूर्वी सुमारे ४० ते ५० एमएलडी सांडपाणी प्रतिदिन येत होते. या अतिरिक्त येणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते नवापूरच्या खाडीत सरळ सोडण्यात येत होते.
सांडपाणी प्रक्रियेविना नवापूर खाडीत
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाºया तारापूूर एन्व्हायरन्मेंट प्रोटेक्शन सोसायटीला (टीईपीएस) बजावलेल्या क्लोजर नोटिशीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पॅरामीटरप्रमाणे सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसून सीओडीचे प्रमाण जिथे २५० पाहिजे तेथे ३००० मिलीग्राम पर लिटर पोचल्याचे तपासणीत निदर्शनास आले आहे, तर सीईटीपीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रासायनिक सांडपाणी येत असल्यामुळे ते प्रक्रियेविना नवापूर खाडीत सोडले जाते, तर काही सांडपाणी नाल्यावाटे ओसंडून वाहत जाते.
आउटलेटच्या सांडपाण्याच्या तपासणीनंतर असे निदर्शनास आले आहे की, सीईटीपीचे व्यवस्थापन प्रदूषण रोखण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्याचप्रमाणे सीईटीपीची देखभाल व दुरुस्ती आणि सुधारणांकडे ही दुर्लक्ष झाल्याने अति प्रदूषित रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे गंभीर प्रदूषण होते म्हणून उद्योगांकडून येणारे रासायनिक सांडपाणी पूर्णपणे थांबवून दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यास पर्यावरण अधिनियमाच्या तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे अनेक ताशेरे ओढण्यात आलेले आहेत.