पटसंख्ये अभावी जि.प.च्या शाळा बंद करण्याचे निकष नियमबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:24 AM2017-07-19T02:24:04+5:302017-07-19T02:24:04+5:30
जिल्हयातील एक किलोमिटरच्या आत दोन ते तीन शाळा असल्यास त्या शाळा केंद्रशाळेला जोडून बाकी शाळा बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले
- लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : जिल्हयातील एक किलोमिटरच्या आत दोन ते तीन शाळा असल्यास त्या शाळा केंद्रशाळेला जोडून बाकी शाळा बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले असून त्याची अंमलबजावणी येत्या ३१ जुलै पर्यत पूर्ण करावयाची आहे़ त्याअनुशांगाने विक्रमगड तालुक्यातील १० शाळांचे प्रस्ताव आहेत मात्र या १० शाळांतील ७ शाळा या जवळजवळ दिड किलोमिटर अंतराच्या असून देखील त्या बंद करण्याचे आदेश असल्याने हा आदेश नियम बाहय असल्याचा आरोप श्रमजीवीचे सरचिटणीस विजय जाधव यांनी केला आहे.
विक्रमगड येथील जि़ प़ शाळांची तपासणी करीत असतांना बंद करण्यात येत असलेल्या गहलेपाडा येथील जि़ प़ शाळेची पाहणी केल्यानंतर केला आहे़
या नियमबाहय आदेशाविरोधात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सोमवारी कोर्टामध्ये याचिका दाखल केलीे असून लवकरच त्याला स्टे मिळेल असे सांगितले़ आज ग्रामीण खेडयापाडयामध्ये शाळा बाहय विदयार्थी शिकला पाहीजे हे उद्दीष्ट समोर ठेवून गाव-पाडयात शाळा सुरु करण्यात आल्या व शासनाने त्याकरीता इमारतींवर करोडो रुपये खर्च केलेले आहेत़ आज यामुळे खेडयातील आदिवासी शिक्षित होत असतांना शाळा बंद करण्याचे आदेश काढणे चुकीचे आहे़ खेडयावर दिवसभर शेतीचे काम करणारा मुलांच्या शिक्षणाकडे पाहत नाही शिक्षण फुकट असतांनाही तो मुलांना शाळेत पाठवत नाही आणि आता शाळाच बंद झाल्या तर शाळा बाहय विदयार्थ्याची संख्या अधिक होईल व आदिवासिंची मुले शिक्षणापासून वंचित राहतील त्यामुळे शासनाने शिक्षणांची कत्तल आरंभिली आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केला असून शाळा पाहाणीमध्ये श्रमजीवीच्या पालघर जिल्हा जेष्ठ कार्यकर्ती आराध्या पंडित, उपाध्यक्ष लक्ष्मण पडवळे, तालुका संघटक रुपेश डोले सचिव कैलास तुंबडा आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते़
शासनाने गहलेपाडा ही २० पटसंख्या असलेली शाळा बंद केली आहे. येथील मुलांना केंद्रशाळा चिंचघर येथे हरविण्याचे आदेश येथील शिक्षकांना आहेत़ परंतु चिंचघर ते गहलेपाडा हे अंतर दिड किलो मीटरचे असल्याने ते नियम बाहय आहे़ आणि इयत्ता पहिली ते चौथीचे विदयार्थी लहान असल्याने त्यांना हा लांबपल्याचा पायी प्रवास न झेपणारा असून रस्त्यावरुन चालतांना अपघात होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे येथील पालकांनी ही शाळा बंद करण्यास विरोधत दर्शविला आहे. जर ही शाळा बंद झाली तर आम्ही आमच्या मुलांसह विक्रमगड शिक्षणविभागात ठिंया मांडुन बसू असे पालक रमेश लहांगे,व बाबुराव सोडे यांसह अन्य पालकांनी इशारा दिला आहे.