विरारमध्ये पाण्यासाठी टॅंकरवर झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 12:18 AM2021-03-10T00:18:16+5:302021-03-10T00:18:41+5:30
पूर्व परिसरात पाणीसमस्या गंभीर : चार दिवसांआड पाणी येत असल्यामुळे त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : पूर्वेच्या चंदनसार भाग, कातकरी पाडा आणि जीवदानी पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टी भागात आता चार दिवसाआड पाणी येत असून, यामुळे येथील पाणी समस्या गंभीर बनत चालली आहे. याविरोधात नागरिक संताप व्यक्त करत असून, त्यांना टँकरचे पाणी मिळविण्यासाठीही मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. टँकर आला की पाणी मिळविण्यासाठी येथील नागरिकांची झुंबड उडत आहे, तर वेळप्रसंगी पाणी विकत आणूनही त्यांना आपली तहान भागवावी लागत आहे.
मागील महिन्यापासून विरार पूर्व पट्टीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ४-५ दिवसांनी नळाला पाणी येत असल्यामुळे अधिक पैसे देऊन नागरिकांना टँकर मागवावे लागत आहेत. या पाणीटंचाईचा गैरफायदा पाणी व्यावसायिक व टँकर माफिया घेत आहे. मात्र, पालिकेकडून याविरोधात अद्याप कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.
ही पाणीटंचाई कृत्रिम असल्याचा आरोप करत, काही राजकीय पक्षांनी याविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र, कोविडच्या प्रादुर्भावामुळे या आंदोलनांवर पाणी फेरले गेले.
मार्च महिन्यातच नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असेल, तर पुढचे दिवस काढायचे कसे, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, केंद्र शासन पुरस्कत अमृत अभियानांतर्गत ३१० किमी जलवाहिनी अंथरणे व विविध ठिकाणी १८ जलकुंभ बांधणे ही कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ४६ हजार नळ जोडण्या देण्यात आल्या असून, त्यांना टप्प्याटप्प्याने जलमापके बसविण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे, शिवाय महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येस पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने खोलसापाडा १ व २ ही धरणे बांधण्याची योजना हाती घेण्यात आलेली आहे. यासह एकूण पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी २३१.९० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित असली, तरी शहरात दिवसेंदिवस वाढणारी पाणीटंचाई गंभीर मानली जात आहे.
महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ४६ हजार नळ जोडण्या देण्यात आल्याचे महापालिका सांगत आहे. मात्र, काही भागांत अजूनही नळ जोडण्या आलेल्या नाहीत. नळ जोडण्यांसाठीची अनामत रक्कम देऊ न शकणाऱ्या काही रहिवाशांना महापालिकेने ही नळजोडणी द्यायला हवी व हे पैसे मासिक बिलातून वजा करावेत.
- डॉ. डी.एन. खरे,
जिल्हाध्यक्ष, बहुजन समाजवादी पक्ष