लर्निंग लायसन्ससाठी विरारच्या आरटीओ कार्यालयात लोकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 12:41 AM2020-12-13T00:41:17+5:302020-12-13T00:41:25+5:30
इंटरनेटअभावी त्रास : मुलाखतींच्या वेळी कोविड नियमांची दक्षता
- मंगेश कराळे
नालासोपारा : विरारच्या आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्सच्या मुलाखतीसाठी लोकांची गर्दी होते. या लोकांची संगणक चाचणी वेळेत केली जाते. कधी-कधी इंटरनेटच्या कनेक्शनमुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो, पण त्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय जात नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या काळात ३ महिने विरारचे आरटीओ कार्यालय बंद होते. नंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत आरटीओ कार्यालय सुरू करण्यात आले. कोरोनाच्या काळात दिवसाला ३२ लोकांचे लर्निंग लायसन्ससाठी मुलाखती घेऊन योग्य ती काळजी घेतली जायची.
लर्निंग लायसन्सकरिता येणाऱ्या प्रत्येकाला गेटवरच थांबवून तोंडाला मास्क बंधनकारक करत, त्याचे शरीराचे तापमान चेक करून, सॅनिटायझर केल्यावर फक्त एकालाच कार्यालयात पाठविले जायचे. १० मिनिटांनी तो आल्यावर दुसऱ्याला पाठवले जात असल्याचे ‘लोकमत’ला अधिकाऱ्याने सांगितले.
आता दर दिवसाला सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत १७० ते १८० लर्निंग लायसन्ससाठी मुलाखती घेतल्या जातात. येणाऱ्या प्रत्येकाला मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांनी इंटरनेटमुळे त्रास झाल्याने लोकांना ताटकळत थांबावे लागत आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
लोकसंख्येच्या तुलनेत आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. यांच्याच साह्याने विरारच्या आरटीओ कार्यालयातील कामकाज चालते. ३४ कर्मचारी, ३ शिपाई, १० अधिकारी असे एकूण ४७ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहे. या ठिकाणी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचेही सूत्रांकडून कळते.
२० ते २५ दिवसांत मिळते पक्के लायसन्स
लोकांना पक्के लायसन्स पोस्टाने राहत्या पत्त्यावर २० ते २५ दिवसांत मिळते. आरटीओ कार्यालयात ५७ ड्रायव्हिंग स्कूल आणि डीलर २० ते २५ जण असून, यांचे प्रत्येकी एक किंवा दोन जण हजर असल्याने दलालांशी लोकांना संपर्क करण्याची गरजच भासत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, काही दलाल कार्यरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
कोरोना काळात योग्य ती काळजी घेऊन लोकांच्या लर्निंग लायसन्सच्या मुलाखती सुरू आहेत. कोणालाही विलंब लागणार नाही, याची काळजी घेतली जाते. ड्रायव्हिंग स्कूल आणि डीलरचे प्रतिनिधी असल्याने दलालांचा प्रश्नच उद्भवत नाही.
- प्रवीण बागडे, आरटीओ अधिकारी