गर्दीच्या पहिल्याच दिवशी महिलांचे प्रचंड हाल, लेटमार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:05 PM2018-11-01T23:05:13+5:302018-11-01T23:05:34+5:30
वसई, अंधेरी लोकल केली विरार लेडिज स्पेशल
नालासोपारा : गेली सहा वर्षे वसई रोड स्थानकातून सोडण्यात येणारी महिला विशेष लोकल गुरूवारपासून विरार स्थानकातून सोडण्यात आल्यामुळे या लोकलमध्ये विरार-नालासोपारा येथील महिला प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे अनेकींचा जीव गुदमरला होता, तर वसई रोड, नायगांवच्या प्रवाशांना या लोकलमध्ये गर्दीमुळे चढता न आल्यामुळे कार्यालयात पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे त्यांना लेट मार्क सोसावा लागला.
१ नोव्हेंबर पासून सकाळी ९.५७ वाजता वसई रोड स्थानकातून गेली सहा वर्षे नियमीत सुटणारी महिला विशेष लोकल विरारहून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात वसईतील अनेक महिला प्रवाशांनी नाराजी व्यक्त करून पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांची मंगळवारी भेट घेऊन हि लोकल रद्द करू नये म्हणून निवेदन दिले होते. गुरूवारी सकाळी वसई रोड स्थानकातून सोडण्यात येणारी महिला विशेष गाडी विरार स्थानकातून सोडण्यात आली. मात्र यातही रेल्वेने मखलाशी करून वसई चर्चगेट गाडी विरार हून सोडण्याऐवजी जनरल विरार-अंधेरी लोकल महिला विशेष करून विरारहून सोडण्यात येणार असल्याची उद्घोषणा केल्यावर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती.
वास्तविक विरार-अंधेरी लोकलची वेळ ९.४७ ची आहे. मात्र या गदारोळात ती उशीराने सुटली व वसई रोड स्थानकात १०.१० मिनिटांनी आली. हि गाडी विरार, नालासोपारा येथून गर्दीने भरून आल्यामुळे वसई रोड स्थानकावरील महिला प्रवाशांना लोकलमध्ये चढता आले नाही. त्यामुळे अनेकांना नंतर येणाऱ्या दुसºया लोकलमधून प्रवास करून बोरीवलीपर्यंत जावे लागले. त्यामूळे अनेकांना कार्यालयात पोहोचायला उशीर झाल्यामुळे लेट मार्क सोसावा लागला.
महिला प्रवासी अस्थमाच्या अॅटॅकने कोसळली
प्रचंड गर्दी व रेटारेटीत विरारहून तुडूंब भरून आलेल्या महिला लोकलमध्ये वसई रोड स्थानकात प्रीती सोनी (वय ३०) या कशाबशा चढल्या. मात्र लोकलमधील गर्दीमुळे त्यांचा जीव कासाविस झाला. लोकलने नायगांव स्थानक सोडल्यावर त्यांनी अस्थमाचा त्रास होत असल्याचे आपल्या मैत्रिणीला सांगितले. मात्र गर्दी प्रचंड असल्यामुळे त्या हलूही शकत नव्हत्या. जीव गुदमरल्यामुळे त्या शेवटी खाली कोसळल्या.
याच वेळी लोकल भार्इंदर स्थानकावर आली होती. डब्यातील इतर महिलांनी चेन खेचली. त्यांना ओळखणा-या महिलांनी त्यांना डब्याबाहेर नेले. मात्र याच वेळी पोलिसांनी चेन पुलींग केल्याच्या आरोपाखाली प्रीती सोनी व इतर महिलांना स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात नेले. प्रीती यांची प्रकृती खालावली असल्याचे लक्षात येताच रेल्वे पोलिसांनी धावपळ करत डॉक्टरांना बोलावून त्यांच्यावर उपचार केले.