नालासोपारा रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी, तिकिटांसाठी रांगा, बंद तिकीट मशिन्समुळे नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 01:53 AM2021-02-02T01:53:05+5:302021-02-02T01:53:37+5:30
Mumbai Local : गेल्या १० महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली रेल्वेसेवा सोमवारपासून सामान्य नागरिकांसाठी सुरू केल्याने नालासोपारा स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती.
नालासोपारा - गेल्या १० महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली रेल्वेसेवा सोमवारपासून सामान्य नागरिकांसाठी सुरू केल्याने नालासोपारा स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. रेल्वेसेवा सुरू झाली तरी प्रवाशांमध्ये राज्य सरकारने ठेवलेले वेळापत्रक, तिकिटांसाठी रांगा, बंद तिकीट मशिन्स या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात नाराजी होती. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस आणि जीआरपी व आरपीएफ पोलिसांनी रात्रीपासूनच रेल्वे स्थानकांच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.
लॉकडाऊननंतर बंद केलेली रेल्वेसेवा १ फेब्रुवारीपासून सामान्य नागरिकांसाठी काही सिमीत ठेवलेल्या वेळेत सुरू करण्यात आली आहे. दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत आणि नंतर रात्री नऊ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत सामान्य प्रवासी प्रवास करणार आहे. कामावर जाण्याची वेळ सकाळीच असल्याने सकाळची वेळ राज्य सरकारने द्यावी, अशी विनंती प्रवाशांनी केली आहे.
१२ वाजता प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ९ वाजल्यापासून तिकीट काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या. तीन तास रांगा लावून रेल्वेचे तिकीट मिळाल्यावर काही जणांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आयडी, तिकीट रेल्वे पोलीस तपासून रेल्वे स्थानकांवर पाठवत होते. ज्यांच्या तोंडाला मास्क नाही त्यांना रेल्वे स्थानकांवर येण्यास बंदी घातली होती. स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही याची काळजी रेल्वे पोलिसांनी घेतली होती. रेल्वे पोलीस माईक, रेल्वेच्या अनाऊन्समेंट करून सामान्य नागरिकांना आवाहन करत होते. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तिकिटांच्या खिडक्या वाढवल्या नसल्याने तिकिटांसाठी तुफान गर्दीचे चित्र नालासोपारा येथे दिसत होते. वेळेवर तिकीट न मिळाल्याने रेल्वेने प्रवास करता आला नाही म्हणून रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे.
सामान्य प्रवाशांसाठी रेल्वेची योग्य सुविधा नसून ज्यांच्याकडे आयडी आहे, सरकारी कर्मचारी यांनाच रेल्वेची सुविधा मिळत आहे. सामान्य चाकरमानी प्रवासी सकाळी ७ वाजता रेल्वेने नऊ वाजेपर्यंत कामाला जातात, पण ती वेळ प्रवासासाठी ठेवलीच नाही.
- राजेंद्र माने, संतप्त प्रवासी
रेल्वेतून प्रवास करण्यासाठी दिलेल्या वेळेतच सामान्य नागरिकांनी प्रवास करावा यासाठी आवाहन करत असून चोख बंदोबस्त रेल्वे स्थानकांवर ठेवण्यात आला आहे.
- सचिन इंगले,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे पोलीस
तब्बल १० महिन्यांनंतर सामान्य प्रवाशांसाठी विरारहून सुटली पहिली लोकल
वसई : विरार-चर्चगेट ही मुंबई उपनगरीय लोकल सेवा अखेर सोमवारी १० महिन्यांनंतर सर्वसामान्यांसाठी सुरू झाली. विरार रेल्वेस्थानकातून पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पहिली विरार-चर्चगेट लोकल सेवा तुरळक प्रवाशांच्या हजेरीत सुरू होताच प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. राज्य सरकारने प्रवाशांच्या आरोग्याची काळजी व दक्षता घेत तब्बल १० महिन्यांनंतर कोरोनाचे संकट थोडेफार दूर झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी मुंबई उपनगर शहरांची लाइफलाइन असलेली उपनगरीय विरार ते चर्चगेट अशी लोकल सेवा सुरू केली आहे.
कोरोना संसर्गामुळे मागील १० महिने ही लोकल सेवा पूर्णपणे बंद होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक स्टेशनकडे फिरकलेदेखील नव्हते.मात्र सोमवारी सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू झाल्याने सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पहाटेपासूनच तिकीट खिडकीवर प्रवाशांची लगबल पाहायला मिळाली, तर वसई, नालासोपारा आणि विरार रेल्वे स्टेशनवर तिकीट खिडक्या मोजक्याच उघडल्याने थोड्याफार रांगा तिकिटासाठी लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. अर्ध्या तासाहून अधिक वेळ सर्वसामान्य प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागले.