कल्याण पूर्वेत पाण्याची ओरड
By admin | Published: December 10, 2015 01:50 AM2015-12-10T01:50:05+5:302015-12-10T01:50:05+5:30
शहराच्या पूर्व भागात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांना भेडसावत आहेत. नागरिकांनी पाण्यासाठी नगरसेवकांकडे दाद मागितली आहे
कल्याण : शहराच्या पूर्व भागात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांना भेडसावत आहेत. नागरिकांनी पाण्यासाठी नगरसेवकांकडे दाद मागितली आहे. पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी संतप्त शिवसेना नगरसेवकांनी महापौरांकडे धाव घेतली. महापौर, नगरसेवक व पाणी पुरवठा अभियंता यांच्या एक बैठक पार पडली. त्यानंतर पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याचे ठरले आहे. तोडगा निघालाच तर पूर्वेतील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. अन्यथा कल्याण पूर्वेतील पाणी प्रश्न हा तसाच कायम राहून नागरिकांची पाण्याविना फरपट होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहराच्या पूर्वेला पाण्याचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून आहे. पूर्व भाग हा उंच सखल आहे. भौगोलिक स्थिती पाणी पुरवठयासाठी अनूकूल नाही. नागरीकांनी मोर्चे काढले. आंदोलने केली आहेत. रस्त्यावर उतरून हा प्रश्न विधीमंडळापर्यंत चर्चेला नेऊन देखील प्रश्न सुटण्याऐवजी जैसे थे आहे. पाणी कमी दाबाने येते.त्याचबरोबर काही ठिकाणी पाण्यात किडे आढळले. याबाबत तक्रार करूनही त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही.
१शिवसेना नगरसेवक स्नेहल पिंगळे, निलेश शिंदे, माधुरी काळे, राजाराम पावशे, शितल भंडारी यांनी त्यांच्या प्रभागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. शनिनगर, आनंदवाडी, विजयनगर याठिकाणी पाण्याची तीव्र समस्या नागरीकांना सतावत आहे. महापालिकेने पाणीपुरवठा योजना राबविल्यावर कल्याण पूर्वेला ६० दशलक्ष लिटर पाणी देण्याचे मान्य केले होते. आजमितीस पाणी टंचाईचे कारण पुढे करुन ३५ दशलक्ष लिटरच पाणी पुरविले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. पाणी टंचाईसाठी संप, विजेअभावी पंप बंद आहे. २नदीच्या पाण्याची पातळी खाली गेली अशी कारणे सांगितली जातात. ही कारणे कल्याण पूर्वेसाठी असतील तर कल्याण पश्चिम व डोंबिवली शहरासाठी का लागू होत नाही. त्याठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत असतो. याचाच अर्थ कल्याण पूर्वेला दुजाभावाची वागणूक महापालिका प्रशासनाकडून दिली जात आहे. ३महापालिकेची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली नव्हती. महापालिका औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून होती. त्यावेळी तत्कालीन महापौर वैजयंती घोलप यांनी १० दशलक्ष लिटरचा वाढीव पाणी पुरवठा कल्याण पूर्वेला करण्यासाठी ठराव केला होता. मात्र त्याला महामंडळाने हिरवा कंदील दिला नाही. त्यामुळे तो ठराव कागदावर राहिला. घोलप यांनी महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी पोलिसांच्या लाठीहल्ल्यात त्या जखमी झाल्या होत्या. तसेच तत्कालीन मनसे नगरसेवक नरेंद्र गुप्ते यांनी महामंडळाच्या कार्यालयातील खूर्ची कार्यालयाबाहेर फेकून दिली होती. नगरसेवक निलेश शिंदे यांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले होते.