पालघर जिल्ह्यात काळ्या तिळाची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 10:22 PM2019-11-02T22:22:19+5:302019-11-02T22:22:57+5:30
प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प । औषधी गुणधर्म असूनही केले दुर्लक्ष
पालघर : जिल्ह्यातील ६०० हेक्टर क्षेत्रापैकी १०० हेक्टर क्षेत्रावर औषधी समजल्या जाणाऱ्या काळ्या तिळाची लागवड करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात काळ्या तिळाचा असा प्रकल्प राबविणारा पालघर तालुका एकमेव ठरणार असून काळ्या तिळाच्या उत्पादनासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणारा आहे.
जिल्ह्यात एकूण १ लाख ६ हजार ३६४ हेक्टर क्षेत्र हे लागवडीचे सरासरी क्षेत्र असून त्यापैकी १ लाख १ हजार ००१ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष विविध पिकांची पेरणी करण्यात आलेली आहे. भातपिक लागवडीसाठी एकूण ७६ हजार ३८८ क्षेत्रापैकी ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. तर ११ हजार २०५ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ११ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रावर नागलीचे पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात शक्यतो भात, नागली, वरई, उडीद, तूर, भुईमूग, कुळीथ, मूग, चवळी, खुरासनी आदी पिके घेतली जात असली तरी तिळाच्या लागवडीच्या ६०० हेक्टर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी तिळाची लागवडच केली नसल्याचे दिसून आले आहे. या पीक लागवडीच्या संदर्भातील शेतकºयांची उदासीनता दूर करण्याचे प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले आहेत.
पालघर तालुक्यातील बहाडोली, चहाडे, सागावे, गिरनोली, लालठाणे, तांदूळवाडी, पारगाव या सूर्या नदीच्याजवळच्या इतर काही गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून काळ््या तिळाची १५० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर लागवड केली जात आहे. मात्र येथील शेतकरी या काळ्या तिळापासून घरगुती वापरासाठी तेल तयार करत असतात.
तालुक्यातील रब्बी लागवड क्षेत्र दुप्पट करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले असून केंद्र सरकारच्या भात पड क्षेत्र विकास लागवड कार्यक्र मांतर्गत बहाडोली व परिसरात असलेल्या काळ््या तिळाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून शेतकºयांना त्यादृष्टीने प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
सूर्या नदीजवळ असलेल्या या शेती बागायती पट्ट्यांमध्ये काळ््या तिळाची लागवड केली जात असून त्याच्या औषधी गुणधर्मामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असूननही उत्पादनाकडे हवे तसे लक्ष दिले गेले नव्हते. पालघर तालुका कृषी विभागाने केंद्र सरकारच्या टी.आर.एफ.एल या पड क्षेत्रात रब्बी लागवड करण्याच्या योजनेअंतर्गत सुमारे ६०० हेक्टर क्षेत्रापैकी १०० हेक्टरहून अधिक क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर काळा तीळ लागवडीचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
सातत्याने नवीन प्रयोग शेतकºयांनी करणे गरजेचे आहे असे सातत्याने कृषी विभागाकडून सांगितले जाते. मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.
मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात
येथील शेतकºयांना बियाणे देण्यात येणार असून सरकारी योजनेअंतर्गत त्यांना आवश्यक ती द्रव्य रूपातील खत व इतर सामग्री पुरवण्यात येणार आहे. याकरिता शेतकºयांना कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रकल्प मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांना या पिकाद्वारे रब्बी हंगामात अधिक प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे.