शेतकऱ्यांना उत्पन्न देणारी कडबा शेती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 12:35 AM2020-01-19T00:35:05+5:302020-01-19T00:39:02+5:30
ज्या शेतक-यांकडे शेतीसाठी पुरेसा पाणीसाठा आहे ते शेतकरी गुरांसाठी लागणारा हिरवा चारा, कडबा शेती करून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेत आहेत.
- वसंत भोईर
वाडा : गुरांसाठी खास हिरवा चारा देणारी कडबा शेती वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न देणारी ठरली आहे. या शेतीतून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. वाडा तालुक्यात ४०० एकरहून अधिक क्षेत्रात कडबा शेती केली जात असून जवळपास दीडशेहून अधिक शेतकरी या शेतीत उरतले आहेत.
खरीप हंगामात भात शेतीचे उत्पन्न घेतल्यानंतर काही शेतकरी रब्बी पिकाचे तर काही भाजीपाल्याचे उत्पन्न घेतात. मात्र ज्या शेतक-यांकडे शेतीसाठी पुरेसा पाणीसाठा आहे ते शेतकरी गुरांसाठी लागणारा हिरवा चारा, कडबा शेती करून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेत आहेत.
वाडा तालुक्यातील गारगाई आणि पिंजाळी नदीकाठी असलेल्या पीक, शिलोत्तर, गारगाव, पिंजाळ, दाभोण अशा दहा ते बारा गावांतील दीडशेहून अधिक शेतकºयांनी गुरांना हिरवा चारा देणारी मक्याची कडबा शेती केली आहे. तालुक्यात जवळपास चारशे एकर क्षेत्रात केला जाणारा हा हिरवा चारा वाडा तालुक्यातील पिंजाळ येथील ३५० गायींच्या तबेल्यात तसेच वाडा येथील श्रीराम दृष्टी गोशाळा, ओम डेरी व परिसरातील तबेल्यांमध्ये सव्वा तीन रुपये प्रति किलोने विकला जातो.
येथील जमिनीत रब्बी हंगामात अन्य पिकापेक्षा कडबा शेती ही खूपच फायदेशीर ठरली आहे.
- बाबुराव पाटील, शेतकरी, शिलोत्तर
भात पिकाच्या उत्पन्नानंतर तिळाचे पीक व त्यानंतर कडबा शेती असे वर्षातून तीन उत्पन्न एकाच जमिनीत मी घेत असतो.
- नितीन पाटील, शेतकरी,
मौजै - पीक, ता. वाडा.
कमी खर्चात अधिक उत्पन्न
कडब्याचे उत्पन्न घेण्यासाठी एका एकरास १५ हजार रुपयांचा खर्च येता. आणि एका एकरातून ६० हजार रुपयांचा कडबा तयार होतो.