सनसिटी-गासमधील ‘सायकल ट्रॅक’ रखडलेलाच; दीड वर्षापूर्वी झाले होते भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:55 AM2020-02-08T00:55:56+5:302020-02-08T00:56:18+5:30

वसई-विरार महापालिकेला खारभूमी विभागाच्या परवानगीची प्रतीक्षा

The 'Cycle Track' is maintained in Cincinnati-Ga.; Bhumipoojan took place a year and a half ago | सनसिटी-गासमधील ‘सायकल ट्रॅक’ रखडलेलाच; दीड वर्षापूर्वी झाले होते भूमिपूजन

सनसिटी-गासमधील ‘सायकल ट्रॅक’ रखडलेलाच; दीड वर्षापूर्वी झाले होते भूमिपूजन

googlenewsNext

- आशीष राणे 

वसई : वसई-विरार महापालिकेच्या नवघर-माणिकपूर शहरात दीड वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून भूमिपूजन करण्यात आलेला ‘सायकल ट्रॅक’ अद्यापही रखडलेलाच आहे. या सायकल ट्रॅकसाठी महापालिकेला खारभूमी विभागाच्या परवानगीची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले.

‘एच’ प्रभाग समितीअंतर्गत सनसिटी भागातील मुख्य रस्त्याच्या कडेला ‘सायकल ट्रॅक’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत दि. ४ नोव्हेंबर २०१८ ला तत्कालीन महापौर नारायण मानकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. मात्र जवळपास १६ महिने झाले तरी या सायकल ट्रॅकचे काम आजमितीपर्यंत सुरू झालेले नाही. हा ट्रॅक केवळ कागदावरच रखडलेला असल्याची माहिती महापालिकेच्या शहर अभियंता विभागाकडून प्राप्त झाली आहे. यापूर्वी आर्थिक निधीची कमतरता हे प्रशासकीय कारण देणाऱ्या महापालिकेने आता पुन्हा येथील खारभूमीची परवानगी मिळणे बाकी असल्याचे कारण पुढे केले आहे.

नवघर-माणिकपूर शहर प्रभाग समिती ‘एच’अंतर्गत सनसिटी-गास हा मुख्य रस्ता पश्चिम पट्टीच्या गावात जातो. तर दोन्ही बाजूला खाडी व झाडे अशा निसर्गरम्य परिसरामुळे हा रस्ता प्रसिद्ध असून येथे सकाळी व संध्याकाळी वसई रोड येथील नागरिक धावण्यासाठी व चालण्यासाठी येतात. या रस्त्यावर पालिकेने आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असा फिटनेस जपण्याच्या उद्देशाने हा सायकल ट्रॅक तयार करण्याचे ठरविले होते.

सनसिटी येथील पोलीस चौकी ते तुळजाभवानी मंदिरापर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला चार मीटर रुंद असा ट्रॅक तयार होणार होता, मात्र आता २०२० उजाडले म्हणजेच दीड वर्षे लोटली तरीही अद्याप येथील सायकल ट्रॅक तयार होताना दिसत नसल्याने परिसरातील नागरिक सतत विचारणा करीत आहेत. या निसर्गरम्य परिसरात हा सायकल ट्रॅक तयार झाल्यावर नागरिकांचा फिटनेसही जपला जाईल आणि नेहमीची सकाळ व संध्याकाळची गर्दी पाहता हा सायकल ट्रॅक पर्यटकांचे आकर्षक केंद्रही बनेल, असे प्रांजळ मत तत्कालीन महापौर नारायण मानकर यांनी व्यक्त केले होते.

दरम्यान, या सायकल ट्रॅकची मार्गिका सुरक्षित असली पाहिजे, यासाठी पालिका सनसिटी येथील रस्त्याचे रुंदीकरण करून स्वतंत्र मार्गिका तयार करणार होती. मात्र अद्यापही सायकल ट्रॅक तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्याचे दिसून आले आहे. सनसिटी परिसरात जर सायकल ट्रॅक तयार झाला, तर नागरिकांना मोकळ्या जागेत सायकल चालविता येईल, परंतु यावर पालिकेने अजून कोणतीच सुरुवात केली नसल्याने सायकलप्रेमी पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

खारभूमी विभागाच्या काही परवानग्या बाकी असून त्या प्राप्त झाल्यावर येथील काम सुरू होईल, असे पालिकेच्या ‘एच’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्सालवीस यांनी सांगितले. तर तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर काम पूर्ण होईल, असे पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले.

गास ग्रामस्थांचा विरोध

महापालिका तयार करीत असलेला ट्रॅक हा ग्रामस्थांच्या विरोधामुळे वादाच्या भोवºयात सापडला होता. यावर पालिकेने या रस्त्यावर पालिका कोणतेच बांधकाम करत नसून केवळ रस्त्याचे रुंदीकरण करणार असल्याचे स्पष्टीकरण देऊन त्या वेळी या वादावर पडदा टाकला होता. मात्र ग्रामस्थांचा विरोध कायम आहे.

मुळात जो रस्ता पालिकेच्या मालकीचाच नाही, त्या रस्त्यावर पालिका सायकल आणि जॉगिंग ट्रॅक कसे बनवू शकते, असा सवाल गास ग्रामस्थांनी केला आहे. दिवाणमान, चुळणे आणि गास या गावांतून हा रस्ता जातो. मात्र ही खाजण जमीन असून गास गावातील अनेक शेतकऱ्यांची यात खासगी जमीन अंतर्भूत आहे. त्यामुळे या वेळी गास गावातील ग्रामस्थांनी आंदोलन करून रस्त्याला विरोधही केला होता. तर आजही जर काम सुरू झाले तर हा विरोध पुन्हा उफाळून येईल, अशी चर्चा आहे.

Web Title: The 'Cycle Track' is maintained in Cincinnati-Ga.; Bhumipoojan took place a year and a half ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.