आंदोलनामुळे डहाणू - बोर्डी प्रमुख राज्यमार्ग ठप्प, नागरिकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:32 AM2019-11-27T00:32:12+5:302019-11-27T00:32:33+5:30

स्थानिक शेतकरी, मजूर, युवक, विद्यार्थी आणि महिला यांचे विविध प्रश्न आणि मागण्या गतवर्षीच्या ठिय्या आंदोलनाद्वारे मांडल्यानंतर चर्चेद्वारे सोडविण्याचे आश्वासन स्थानिक प्रशासनाने पूर्ण न केल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोमवार, २५ ते २६ नोव्हेंबर रोजी प्रांत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

Dahanu-Bordi highway jam due to agitation | आंदोलनामुळे डहाणू - बोर्डी प्रमुख राज्यमार्ग ठप्प, नागरिकांचे हाल

आंदोलनामुळे डहाणू - बोर्डी प्रमुख राज्यमार्ग ठप्प, नागरिकांचे हाल

Next

डहाणू/बोर्डी  - स्थानिक शेतकरी, मजूर, युवक, विद्यार्थी आणि महिला यांचे विविध प्रश्न आणि मागण्या गतवर्षीच्या ठिय्या आंदोलनाद्वारे मांडल्यानंतर चर्चेद्वारे सोडविण्याचे आश्वासन स्थानिक प्रशासनाने पूर्ण न केल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोमवार, २५ ते २६ नोव्हेंबर रोजी प्रांत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर हजारो आंदोलक बसल्याने चोवीस तासांपेक्षा अधिक काळ हा मार्ग बंद राहून नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, संबंधित खात्याने प्रलंबित मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन देण्याचे ठरल्यानंतर तसेच महसूल, वन, आरोग्य, वीज वितरण कंपनी, शिक्षण या खात्यांनी तशी हमी पत्रे, तहसीलदार राहूल सारंग यांच्या उपस्थितीत दिल्याने अखेर मंगळवारी दुपारी माकपने बेमुदत आंदोलन मागे घेतले.

गतवर्षी २२ नोव्हेंबर रोजी या पक्षातर्फे प्रांतअधिकारी कार्यालयाबाहेर विविध प्रश्न सोडवण्यासाठी या पक्षाने ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी स्थानिक प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून विविध मुद्दे आणि समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, वर्ष उलटूनही त्याची पूर्तता न झाल्याने आंदोलकांमध्ये असंतोष वाढला. अखेर २५ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता पारनाका ते प्रांत कार्यालय या दरम्यान सुमारे १० हजार आंदोलक धडकले. स्थानिक प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे पुन्हा तोंडी आश्वासन दिले. वेळ मारून नेण्याची ही खेळी असल्याने त्याला बळी न पडता लेखी आश्वासन दिल्याशिवाय बेमुदत हे आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला.

त्यानंतर मागणी करूनही प्रांत कार्यालयाबाहेरील आवारात बसण्यास प्रशासनाने नकार कळविल्याने नाईलाजास्तव रस्त्यावर बसावे लागले. त्याला प्रशासन जबाबदार असून त्यांच्यामुळेच वाहतूक ठप्प होऊन सुमारे चोवीस तासांपेक्षा अधिक नागरिकांना त्रास सोसावा लागल्याचे किसान सभेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोरखाना यांनी सांगितले. मंगळवारी आंदोलन अधिक आक्रमक झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त अधिक तैनात करण्यात आला होता. तसेच आरपीएफची तुकडीही तैनात करण्यात आली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

दरम्यान, डहाणू शहरातून बोर्डी मार्गे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवर परिणाम जाणवला तर या मार्गावर पारनाका येथून उत्तरेला दोन कि.मी. अंतरावर उप जिल्हा रुग्णालय असून तेथे जाणाºया रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सोसावा लागला असला तरी रु ग्णवाहिकेला रस्ता खुला करून देण्यात आला. डहाणू बस आगाराने तातडीने आगर गावातील पर्यायी मार्गाचे तत्काळ सर्व्हेक्षण करून डहाणू - बोर्डी फेºया त्या अंतर्गत मार्गाने सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला. मंगळवारी दुपारी चार वाजल्यानंतर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले आणि प्रमुख राज्य मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. आॅटो रिक्षा व्यावसायिकांचे तसेच हिवाळी पर्यटनाकरिता बोर्डी पर्यटनस्थळी आलेल्या पर्यटकांचे हाल झाले. शिवाय आगर येथील प्रसिद्ध मच्छीबाजारावरही परिणाम दिसून आला.

पारनाका मार्गावरून जाणा-या २० बस फे-या आगर गावातील पर्यायी मार्गावर वाळविल्याने प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळाला.
-अनिल बेहेरे (डहाणू बस आगार व्यवस्थापक)

या ठिय्या आंदोलनाकरिता प्रांत कार्यालयाच्या आवारातील जागा आंदोलकांना बसण्याकरिता देण्याची विनंती केली होती. मात्र प्रशासनाकडून ती ठोकरण्यात आली. त्यामुळेच नाईलाजास्तव रस्त्यावर बसावे लागून नागरिकांना त्रास झाला. त्याला प्रशासनच जबाबदार आहे.
- चंद्रकांत घोरखाना, किसान सभा अध्यक्ष,
डहाणू तालुका

Web Title: Dahanu-Bordi highway jam due to agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.