भारनियमना विरोधात रास्ता रोको, महिलांचा मोठा सहभाग, आंदोलकांनी पाच तास रोखला डहाणू बोर्डी राज्यमार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 06:07 AM2017-09-13T06:07:18+5:302017-09-13T06:07:18+5:30
महावितरणने लादलेल्या भारनियमनाविरुद्ध डहाणू बोर्डी हा प्रमुख राज्य मार्ग आंदोलकांनी सुमारे पाच तास रोखून धरला. विद्यार्थी महिला, मच्छीमार, बागायतदार आणि आदिवासी हे रणरणत्या उन्हात रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी: महावितरणने लादलेल्या भारनियमनाविरुद्ध डहाणू बोर्डी हा प्रमुख राज्य मार्ग आंदोलकांनी सुमारे पाच तास रोखून धरला. विद्यार्थी महिला, मच्छीमार, बागायतदार आणि आदिवासी हे रणरणत्या उन्हात रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. अखेर वीज मंडळाच्या डहाणू विभागाचे उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र धोडी यांनी भारनियमनाचे तास कमी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले.
महावितरणने भारिनयमनाला प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई बोरिगाव ग्रुप ग्रामपंचायतीचा समावेश वीज मंडळाच्या बोर्डी फिडरमध्ये आहे. येथे प्रतिदिन पहाटे ६ ते दुपारी २ आणि सायंकाळी ७ ते रात्री बारा असे सुमारे तेरा तास भारनियमन केले जाते. याचा त्रास विद्यार्थी, पालक आणि शाळेत अध्यापन करणाºया शिक्षकांना होतो.
झाई हे राज्यातील प्रमुख मासेमारी केंद्र आहे. मासे हे नाशवंत असल्याने त्यांना शितकपाटात ठेवणे अत्यावश्यक असते. मात्र भारनियमनामुळे व्यवसायला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत होता. बोरिगाव हा भाग बागायतींचा असल्याने कृषी जोडण्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, वीज भारनियमन बंद करण्याचे किंवा कालावधी कमी करण्याकरिता नागरिकांनी लेखी निवेदन वीज मंडळाला दिले होते. त्याची दखल न घेतल्याने मंगळवारी दुपारी अकरा वाजता सुमारे चारशे नागरिकांनी बार्डी वीज उप केंद्राला घेराव घातला.
त्यानंतर डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरील विहन्द्रा पूल येथे रस्ता रोको करण्यात आला. त्या मध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनाच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न केल्याने अंतर्गत मार्गावरही कोंडी झाली होती.
दरम्यान, जमावाला हिंसक वळण लागू नये या करिता घोलवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अखेर वीज मंडळाच्या डहाणू विभागाचे उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र धोडी यांनी धाव घेऊन जमावाचे निवेदन स्वीकारले व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने १३ तासाच्या भारनियमनाचा कालावधी साडेआठ तास केल्याचे लिखित आश्वासन साडेचार वाजता दिले. त्यामुळे दिवसभर रणरणत्या उन्हात बसलेल्या शेकडो आंदोलकांचा विजय झाला. आंदोलकांनी तत्काळ रस्ता मोकळा केल्याने वाहतूक पूर्ववत झाली. आता या आश्वासनाच्या अंमलबजावणीकडे लक्ष लागले आहे.
हे भारनियमन तात्पुरत्या कालावधीसाठी असून वेळा पत्रक पूर्ववत होईल. आंदोलकांची मागणी वरिष्ठांपर्यंत ठेवण्यात आली. त्यानुसार साडेआठ तासांपर्यंत भारनियमन करण्यात येईल.
- भूपेंद्र धोडी (वीज मंडळाच्या डहाणू
विभागाचे उपकार्यकारी अभियंता)
शहरी व ग्रामीण असा भारिनयमनाचा कालावधी ठरवताना दुजाभाव केला जाऊ नये. हा भाग महत्वाचे मासेमारी केंद्र व शेतीमाल उत्पादन करणारा असल्याने हे भारनियमन रद्द करावे.
-अर्जुन वांगड
(उपसरपंच झाई-बोरिगाव ग्रुप ग्रामपंचायत)
नागरिक, मच्छीमार सोसायट्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने आंदोलन यशस्वी झाले.
- आशिष तांडेल (युवा मच्छीमार नेता)