Dahanu: डहाणू समुद्रात बोट उलटून मच्छीमाराचा मृत्यू, एकजण बचावला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 03:17 PM2023-07-27T15:17:03+5:302023-07-27T15:17:49+5:30
Dahanu Boat Accident: डहाणू गावच्या समुद्रातून छोटी बोट घेऊन मासेमारीला गेलेल्या दोन तरुण मच्छीमारांपैकी एकाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी डहाणूच्या किनाऱ्यावर आढळला. बोट बुडताच दुसरा तरुण पोहत किनाऱ्यावर पोहचला.
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी - डहाणू गावच्या समुद्रातून छोटी बोट घेऊन मासेमारीला गेलेल्या दोन तरुण मच्छीमारांपैकी एकाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी डहाणूच्या किनाऱ्यावर आढळला. बोट बुडताच दुसरा तरुण पोहत किनाऱ्यावर पोहचला. बेपत्ता मच्छीमारासाठी स्थानिक मच्छीमार व तटरक्षक दलाने शोध मोहीम हाती घेतली होती, मात्र त्यांना अपयश आले.
डहाणू तालुक्यातील मोठी डहाणूच्या मांगेलवाडी येथील दोन मच्छीमार 26 जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास छोटी बोट घेऊन किनाऱ्यापासून एक नोटिकल अंतरावर पारंपरिक पद्धतीच्या बोंबील मासेमारीला गेले होते. लाटेच्या ताडाख्याने बोट उलटून दोघेही पाण्यात फेकले गेले. त्यापैकी संजय प्रकाश पाटील (32) याने पोहून किनारा गाठला, मात्र भुपेंद्र किशोर अंभिरे (34) हा जाळ्यात अडकल्याने त्याला बाहेर पडता आले नव्हते.
दरम्यान, संजय याने अपघाताची माहिती कोळी बांधवांना दिल्यानंतर स्थानिक मच्छीमार, ग्राम सुरक्षा दल, सागरी सुरक्षा दल यांनी शोध मोहीम राबवली. खवळलेला समुद्र तसेच पुराचे पाणी इ. मुळे बेपत्ता तरुणाला शोधण्यात अपयश आले. त्यामुळे भारतीय तटरक्षक दलाने शोध मोहीम हाती घेतली मात्र यश न आल्याने सायंकाळनंतर मोहीम थांबविण्यात आली.
दरम्यान, गुरुवारी सकाळी गहाळ झालेल्या मच्छीमाराचा मृतदेह हाती लागल्याची माहिती डहाणू पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी दिली. मृत मच्छीमाराच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आईवडील व भाऊबहीण इ. समावेश असल्याची माहिती आप्तेष्टांना दिली.