डहाणू किना-यावर स्वच्छतागृहे नाहीत, मूलभूत सुविधांअभावी पर्यटकांची कुचंबणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:33 AM2017-09-28T00:33:06+5:302017-09-28T00:33:28+5:30
शासन पर्यटन वृद्धीकरिता प्रयत्नशील असून कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. डहाणू तालुका हा सागरी पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. मात्र येथे पर्यटकांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे.
- अनिरूध्द पाटील
बोर्डी : शासन पर्यटन वृद्धीकरिता प्रयत्नशील असून कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. डहाणू तालुका हा सागरी पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. मात्र येथे पर्यटकांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे.
महाराष्ट्राच्या सागरी पर्यटनात डहाणू किना-याची लोकप्रियता अधिक अधिक आहे. उत्तरेकडील दिल्ली, राजस्थान, गुजरात या राज्यातील नागरिक पर्यटन हंगामात मोठ्या संख्येने येथे येतात. शिवाय मुंबईप्रमाणेच पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरातील पर्यटक विकेंड करिता पसंती देतात. डहाणू शहरातील नागरिक सायंकाळचा वेळ पारनाका, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी या किनाºयावरच घालवतात. मागील काही वर्षांपासून राज्य शासनाने पर्यटन विकासाकरिता सागरी किनाºयांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये कोकण पर्यटन विकास आणि मेरीटाईम बोर्डाच्या निर्मल सागर तट अभियानाचा समावेश आहे.
मेरीटाईम बोर्डाकडून चिंचणी, नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी आणि तलासरी तालुक्यातील झाई या गावांची निवड केली. त्यांना तीन वर्षांकरिता करारबद्ध करून निधीचे हस्तांतरण केले आहे. सागर किनाºयांची स्वच्छता आणि विविध भौतिक सुविधा निर्माण केल्यानंतर पर्यटकांना आकर्षित करून त्याव्दारे स्थानिक रोजगार वाढविणे हा त्यामागचा उद्देश आहे. शिवाय प्राथमिक सुविधांमध्ये शौचालयाचाही समावेश आहे. परंतु झाई वगळता कोणत्याही पर्यटन स्थळी शौचालये नाहीत. त्यामुळे विशेषत: महिला पर्यटकांची कुचंबणा होत आहे. किनाºयावर शौचाला बसल्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरते व हगणदारीमुक्तीचा बट्टयाबोळ होतो.
त्यामुळे आगामी दिवाळी व पर्यटन हंगामा पूर्वी तालुक्यातील सागरी पर्यटन स्थळी शौचालये बांधण्यात यावीत अशी मागणी जागतिक पर्यटन दिनाच्या पार्श्वभुमीवर स्थानिकांनी केली आहे.
चिंचणी, नरपड, चिखले, घोलवड बोर्डी येथे निर्मल सागर तट अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार निधी वर्ग केला असून शौचालये बांधण्याचे निर्देश दिले आहेत.
- नवनीत निजाई,
बंदर निरीक्षक , मेरीटाईम बोर्ड