डहाणूतील जनजीवन ठप्प, पेरण्या वाचल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:27 AM2017-07-19T02:27:07+5:302017-07-19T02:27:07+5:30
तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे.
सोमवारी संध्याळपासून सुरू झालेल्या पावसाने नदी नाल्यांना पूर आल्याने चिंचणी, वरोर, बाडापोखरण सारख्या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होऊन जनजीवन अत्यंत विस्कळीत झाले होते.
मात्र दुपारनंतर पावसाचा जोर उतरताच ते पूर्ववत झाले. दरम्यान डहाणूत गेल्या २४ तासात १२६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून आता पर्यंत ११९६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने डहणूच्या बंदरपट्टी भागांतील शेतकऱ्यांनी भात लावणीच्या कामांना जोरदार सुरूवात केली आहे.
साधारणता: जूनच्या सुरूवातीस दमदार पावसाला सुरूवात होईल अशी शक्यता राज्याच्या हवामान खात्याने वर्तविली असतांना प्रत्यक्षात पासाने उशिराने सुरूवात केली त्यामुळे भात रोपे उन्हाने काहिशी करपून गेली होती. त्यांना जीवनदान मिळाल्याने आताच्या पावसाने भात लावणीस शेतकऱ्यांनी जोरदार सुरूवात केली असली तरी त्यांना मजूराची उणीव भासू लागली आहे.
दरम्यान सोमवारपासून पाऊस सुरू झाल्याने येथील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली होती. पावसाचा जोर पाहता येथील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.
मृत व्यक्तीच्या वारसाना आर्थिक मदत डहाणूच्या कंक्राडी नदीला आलेल्या पूरात २६ जूनला नातेवाईकाच्या घरी जात असलेल्या कामू सून्या हाडळ रा. कैनाड ही पूरात वाहून मृत्यूमुखी पडली होती. तर २ जुलै रोजी बहारे येथे शेतावर जात असतांना दिपक पांडू धांगडा यांचा ते वंगन नदी ओलांडत असतांना वाहून बूडून मृत्यू झाला. या दोघांच्या कुटुंबियांना डहाणूच्या तहसीलदार प्रितीलता कौरथी यांनी आर्थिक सहाय्य अनुदान म्हणून प्रत्येकी चार लाखांचा धनादेश दिला.