...अन् डहाणू पंचायत समितीवर पडला ‘पोलिसांचा छापा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 03:30 AM2017-10-22T03:30:22+5:302017-10-22T03:30:27+5:30

डहाणू पंचायत समितीवर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून अनेक अधिकारी व कर्मचा-यांना अटक केली.

Dahanu panchayat committee falls on 'police raids' | ...अन् डहाणू पंचायत समितीवर पडला ‘पोलिसांचा छापा’

...अन् डहाणू पंचायत समितीवर पडला ‘पोलिसांचा छापा’

Next

अनिरुद्ध पाटील 
बोर्डी : डहाणू पंचायत समितीवर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून अनेक अधिकारी व कर्मचा-यांना अटक केली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. शहरात तो चर्चेचा विषय झाला होता परंतु त्यातून सुटका हवी असल्यास तोडपाणी करण्याची आॅफरही पुढ्यात ठेऊन या बहुरूपी पोलिसांनी या धाडीमागचे रहस्य उलगडताच घबराटीचे रुपांतर विविध विभागातील हास्यकल्लोळात झाले.
पावसाळ्यातील चार महीने शेती केल्यानंतर उर्वरित आठ महीने विविध रूपं घेऊन पोटासाठी गावोगावी भटकंती करण्याचे खडतर जीवन बहुरूपींच्या वाट्याला आले आहे. महिनोंमहिने घरापासून दूर राहून पायपीट केल्यानंतरही चार पैसे गाठीला जमत नाहीत. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या वेळी सर्वत्र आनंदोत्सव असताना बहुरूपींचे कुटुंबीय मात्र दुसºयांच्या सुखात आनंद शोधतांना दिसतात. मुखवट्यामागून स्वत:च्या डोळ्यातील दु:ख लपवता येते परंतु बायकापोरांना पाहून काळीज हेलावते. तथापि या काळात विविध शासकीय कार्यालयात जाऊन दिवाळी मागायची आणि थोडेफार पैसे जमवून कुटुंबासोबत सण साजरा करण्याची शक्कल लढवत असल्याचे विशेष पथकातील पोलीस बनून आलेल्या या दोन बहुरूपींनी लोकमतला सांगितले. या वेळी त्यांनी पोलिसांचा गणवेश, टोपी, बेल्ट, नेमप्लेट, काळे बूट असा हुबेहूब पेहरावही केला होता.
दरम्यान दात्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी डहाणू पंचायत समिती मधील कृषी, बांधकाम, ग्रामपंचायत, शिक्षण आदि विविध विभागात दोन विशेष पथकातील पोलिस बनून आलेल्या बहुरूपींनी अधिकारी व कर्मचाºयांच्या पुढ्यात वॉरंट ठेऊन त्यांना आरोपी केले. शिवाय गंभीर गुन्ह्यात होणारी अटक टाळण्यासाठी तोडपाणी करावी लागेल अशी व्यावहारीक आॅफरही दिली. अधिकारी व कर्मचाºयांसाठी आधी घाबरवून सोडणारा तर नंतर काहिसा सुखद ठरणारा हा अनुभव होता. होताच शिवाय या विरंगुळ्यातून तणाव मुक्ती साधली गेल्याने त्यांनी स्वखुशीने दिवाळीही दिली. हास्यकल्लोळानंतर बहुरूपींनी आपली खंत व्यक्त केली आणि त्यांची स्वारी पुढे रवाना झाली.

Web Title: Dahanu panchayat committee falls on 'police raids'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.