डहाणू पं.स. प्रवेशद्वार उघडणार कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:24 AM2020-11-25T00:24:21+5:302020-11-25T00:24:39+5:30
आदिवासी, गरीब नागरिकांवर दडपण ; शासकीय कर्मचारी, ठेकेदार घेतात पार्किंग सुविधा
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल करताना, लोकलसेवा, हॉटेल, मंदिरे आणि त्यानंतर शाळांचेही दरवाजे नागरिकांसाठी उघडले. मात्र डहाणू पंचायत समिती इमारतीसमोरील मुख्य प्रवेशद्वार अद्याप बंद आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या महागड्या गाड्या तेथे पार्किंग केल्या जातात. त्यामुळे आदिवासी आणि गरीब नागरिकांना प्रशासकीय इमारतीत प्रवेश करताना दडपण येते. याकरिता तत्काळ हे प्रवेशद्वार उघडण्याची गरज व्यक्त होत आहे.
डहाणू हा आदिवासीबहुल तालुका असून ८५ ग्रामपंचायतींचा कारभार पारनाका येथील पंचायत समितीच्या इमारतीतून चालतो. कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या. त्याअंतर्गत या प्रशासकीय इमारतीसमोरील मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दक्षिणेकडील अन्य प्रवेशद्वाराचा वापर केला जातो. या तालुक्यात सुमारे चार लाख लोकसंख्या असून विविध कामाकरिता नागरिक येथे येतात. तर
लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्या घेऊन गटविकास अधिकारी तसेच अन्य विभाग प्रमुखांची भेट घेतात. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या कार्यालयाकडे येणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. परंतु पंचायत समिती प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वार उघडण्याचा निर्णय न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे प्रवेशद्वार बंद असल्याने शासकीय कर्मचारी या जागेचा वापर चारचाकी पार्किंगसाठी करतात. त्यापैकी अनेक कर्मचारी, ठेकेदार कारला खेटून ग्रुपचर्चा तसेच मोबाईलवर संभाषण करतात. अनेक खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासनाच्या पट्ट्या लावलेल्या असतात. या महागड्या गाड्या पाहून साध्याभोळ्या आदिवासींची पावले पुढे जाण्यास धजावत नाहीत.
इमारतीच्या आवारात पार्किंगची समस्या आणि कोरोनामुळे गर्दीचे नियोजन करण्याच्या उद्देशाने मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवले होते. नागरिकांची मागणी असल्यास मुख्य प्रवेशद्वार उघडण्यात येईल.
- बी.एच.भरक्षे
गटविकास अधिकारी, डहाणू पंचायत समिती.