चौथ्या राष्ट्रीय गलोल स्पर्धेत डहाणूतील विद्यार्थ्यांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:32 AM2018-04-24T00:32:34+5:302018-04-24T00:32:34+5:30
पाच सुवर्ण, तीन रौप्य व पाच कास्यपदकांची लयलूट : मिनिस्ट्री आॅफ युथ अफेअर्स अॅण्ड स्पोर्ट्समार्फत स्पर्धेचे आयोजन
बोर्डी : चौथ्या राष्ट्रीय गलोल स्पर्धेत डहाणूतील विद्यार्थ्यांनी पदकांची अक्षरश: लयलूट करीत पाच सुवर्ण, तीन रौप्य व पाच कास्य पदकांची कमाई केली. त्या मध्ये रूपेश पाटकर (२० मीटर), पिंटू भोनर (२५ मीटर), विजय गुहे (३० मीटर) अर्चना माढा (३० मीटर) यांनी गलोल स्पर्धेत सुवर्ण तर एयरगन प्रकारात पिंटू भोनर याने सुवर्णपदक पटकावले.
मिनिस्टरी आॅफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स गव्हर्नमेंट आॅफ इंडिया या मान्यता प्राप्त संस्थेकडून शिर्डी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोळा आणि एकोणीस वर्षीय तसेच खुल्या गटात स्पर्धा पार पडल्या. पालघर गलोल असोसियशन तर्फे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी त्या मध्ये सहभागी झाले होते.
श्रीकांत सूक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या वांगर्जे चरीपाडा शाळेच्या रूपेश पाटकर याने (२० मीटर) सुवर्ण, पिंटू भोनर (२५ मीटर) सुवर्ण, विजय गुहे (३० मीटर)सुवर्ण आणि अर्चना माढा (३० मीटर) सुवर्ण रोहित माढा याने १५ मीटर प्रकारात रौप्य पदकांची कमाई केली.
१६ वर्षाखालील मुलांच्या गटात २० मीटर अंतरावरून गोवणे शाळेच्या अजित ताम्बडा या विद्यार्थ्यांने दूसरा क्र मांक मिळवून रौप्य पदक पटकावले. तर याच गटात मुलींमध्ये अंजली मालकरीने रौप्य पदकाला गवसणी घातली.
३० मीटर प्रकारात निर्जला मंडळला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. त्यांना विजय पावबाके व दीपक साळवी यांचे मार्गदर्शन लाभले होते. अनिल वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली १० मीटर प्रकारात शिसने शाळेच्या शैलेश सोमण याने कास्य पदक पटकावले.
शिवाय एयरगन प्रकारात पिंटू भोनर याने (२५ मीटर) सुवर्ण पदकावर निशाणा साधला. रोहित माढा याने (१० मीटर) कास्य, अमति माढा (१५ मीटर) कास्य, अरु ण काळे (२० मीटर) कास्य पदक पटकावले. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेसाठी प्रवास खर्च आणि प्रवेश फी आरम्भ संस्था, रोटरी क्लब आॅफ बॉम्बे पियर, प्रारम्भ संस्था व रोटरी क्लब आॅफ ठाणे पैराडाइस, केआयएफसी मुंबई तसेच विक्र मगड येथील जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांनी आर्थिक सहकार्य केले.
अजय जाणार इटलीला
इटली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गलोल स्पर्धेसाठी डहाणू तालुक्यातील अजय पागी या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. गत गतवर्षी त्याने राष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.
इंटरनेटच्या माध्यमातून नेमबाजीतील खेळाडूंचे वीडियो प्राप्त करून ते स्पर्धकांना दाखवले. सरावा करीता या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ झाला.
-विजय पावबाके, मार्गदर्शक