डहाणू-तलासरीतील भूकंप शासनाने गांभीर्याने घ्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 11:18 PM2019-12-25T23:18:23+5:302019-12-25T23:18:47+5:30

तातडीने पुनर्वसन करावे : विनोद निकोले यांची पुनर्वसनमंत्र्यांकडे मागणी

The Dahanu-Talasari earthquake should be taken seriously by the government | डहाणू-तलासरीतील भूकंप शासनाने गांभीर्याने घ्यावेत

डहाणू-तलासरीतील भूकंप शासनाने गांभीर्याने घ्यावेत

Next

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरीमध्ये सौम्य व तीव्र भूकंपाचे धक्के वारंवार बसत असून त्या अनुषंगाने शासनाने तत्काळ दखल घेऊन नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी व त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी भूकंप व पुनर्वसन मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आ. निकोले म्हणाले की, डहाणू, तलासरी, दापचरी, कवाडा, उधवा, वंकास, कासा अशा अनेक गावांतील घरांना भूकंपामुळे तडे गेले आहेत. वर्षभर सौम्य व मध्यम स्वरूपाचे शेकडो धक्के या परिसरात सातत्याने सुरूच आहेत. महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील किल्लारीला झालेल्या भीषण भूकंपानंतर आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसन कार्याचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी यांत सुसूत्रता असणे किती महत्त्वाचे आहे हे प्रथमच अधोरेखित झाले आहे. किल्लारीचा भूकंप ही संपूर्ण जगासाठी आणि भारतासाठी पहिली लक्षवेधी आपत्ती ठरली. तरी ही बाब विचारात घेऊन सध्या पालघरमध्ये होत असलेल्या भूकंपांची गंभीर दखल का घेतली जात नाही? डहाणू व तलासरी तालुक्यात वारंवार होणाऱ्या भूकंपांच्या धक्क्यांमुळे ग्रामस्थांवर मानसिक आघात केला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाच्या या हादऱ्यांनी घरांच्या भिंतींना भेगा पडल्या असून काही घरे खचली आहेत.
त्या अनुषंगाने भूकंप सतत का होत आहेत त्याचे संशोधन करण्यात यावे. भूकंपाचे लहान-मोठे धक्के बसत असून या धक्क्यांपासून होणारी जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने संबंधित भागात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे.

एनडीआरएफ तुकडी तैनात करण्याची मागणी
पालघर जिल्ह्यात बसणाºया भूकंपांच्या धक्क्यांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात याव्यात, बाधित कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार कॉ. विनोद निकोले यांनी केली आहे. दरम्यान, निकोले यांनी डहाणूच्या वंकास खुबाळे, धुंदलवाडी, दापचरी इत्यादी गावागावात खेड्यापाड्यात भेट देऊन आदिवासी बांधवांशी चर्चा केली आहे. शिवाय या परिसरात एनडीआरएफ तुकडी तैनात करण्याची मागणी केली आहे.

Web Title: The Dahanu-Talasari earthquake should be taken seriously by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.