डहाणू तालुका तीन दिवसांपासून अंधारात खितपत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:17 AM2018-06-18T03:17:24+5:302018-06-18T03:17:24+5:30
डहाणू तालुक्यातील बंदरपट्टी भागातील चिंचणी, वरोर, वानगांव, साखरे, इत्यादी फिडर अंतर्गत येणाऱ्या सुमारे पन्नास ते साठ गावे तसेच तीस ते चाळीस खेडोपाड्यात गेल्या तीन दिवसांपासून वीज बेपत्ता झाली आहे.
डहाणू : डहाणू तालुक्यातील बंदरपट्टी भागातील चिंचणी, वरोर, वानगांव, साखरे, इत्यादी फिडर अंतर्गत येणाऱ्या सुमारे पन्नास ते साठ गावे तसेच तीस ते चाळीस खेडोपाड्यात गेल्या तीन दिवसांपासून वीज बेपत्ता झाली आहे. तर संपूर्ण पालघर जिल्ह्यातील वीज रविवार सकाळपासून ते दुपारपर्यंत बेपत्ता होती. देखभाल व दुरूस्तीच्या नावाखाली गेली चार महिने म्हणजेच दर शुक्रवारी आठ ते दहा तास वीज पुरवठा खंडीत केला जात होता. त्यामुळे पावसाळयात वीज पुरवठा सुरळीत राहील असे वाटले होते, परंतु पहिल्या पावसाच्या हलक्या सरीतच वीज महावितरणची अब्रू चव्हाटयावर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. १५ जून रोजी आठ तास, १६ जून रोजी रमजान ईद असतांना देखील सकाळी देदाळे सब स्टेशन मध्ये बिघाड झाला. त्यानंतर बोईसर येथील १३२ के.व्ही. मध्ये बिघाड झाल्याने सहा तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दिवसभर वीजेचा लपंडाव सुरू राहिल्याने नागरिक त्रस्त झाले होते. तर रविवारी सकाळपासून १३२ के.व्ही. मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यांने संध्याकळ पर्यंत वीज आली नव्हती. परिणामी साखरे धरणाची मोटार बंद पडून २९ गावांना पाणी पुरवठा होऊ शकला नाही. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बंदरपट्टी भागांत वीज नसल्याने येथील गावांतील काम, धंदे, विशेषत: डायमेकिंग व्यवसाय बंद पडून नागरिकांचे लाखोचे नुकसान झाले आहे.
>उच्च वाहिन्या नादुरस्त तरी रेल्वेचा वीजपुरवठा सुरू
पॉवरग्रीड कॉरपोरेशन आॅफ इंडिया लिमिटेडच्या उच्चदाब वाहिन्या नादुरु स्त झाल्याने पालघर जिल्हयातील ७० भागाचा वीजपुरवठा रविवारी सकाळी १० ते ४.३० वाजेपर्यंत खंडित झाला होता. २२० केव्ही खैराफाटक वाहिनी क्र . १ व २ नादुरस्त झाल्याने पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, विक्र मगड, मोखाडा, तलासरी या तालुक्यातील वीज खंडित झाली. परंतु संध्याकाळी ४.३०ला ती सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. रेल्वेचा वीज पुरवठा सुरळीत ठेवून दुपार पर्यंत काही भागाचा वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले तर पहिल्याच पावसाने दणका दिल्याने वीज यंत्रणेचे पितळ उघडे पडले. बोईसर येथील खैरापाडा येथे असलेल्या २२० के व्ही क्षमतेच्या सब स्टेशनला कोलशेत-पडघा, बोरिवली -तारापूर व पॉवर ग्रीडच्या टॉवरने वीजपुरवठा होत असून तेथून विविध भागात सर्वत्र वीजपुरवठा होतो. शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास बोरिवली -तारापूर तर आज सकाळी १०च्या सुमारास पॉवर ग्रीडच्या अशा दोन्ही वीजवाहिनीवर वेगवेगळ्या कारणाने ट्रिपिंग झाल्याने सुमारे १२०० उद्योगा सह लाखो वीजग्राहकांना त्याचा फटका बसला.
>पहिल्याच पावसात तलासरीची बत्ती गुल
तलासरी : या भागात शनिवारी पडलेल्या पहिल्याच पावसाने वीज मंडळाची पोल खोल झाली, वाºया सह पडलेल्या पावसाने भागातील बत्ती गुल झाली ती पूर्ववत करण्यास महावितरणच्या कर्मचाºयांना २४ तासानंतरही यश आले नसल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. अंधार, गर्मी त्यातच डासांचा उपद्रव या मुळे नागरिक कमालीचे हैराण झाले.