डहाणू तालुक्यात ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:26 AM2020-12-16T00:26:09+5:302020-12-16T00:26:12+5:30
‘जेएनपीटी’चे श्राद्ध : बंदरविराेधी घाेषणांचा घुमला आवाज
डहाणू : निसर्गसौंदर्याने नटलेल्या डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाढवण येथील प्रस्तावित बंदराला विरोध करण्यासाठी मंगळवारी चिंचणी ते धाकटी डहाणूपर्यंतच्या सर्व गाव-खेड्यांतील नागरिकांनी एकजुटीने बंद पाळला. किनारपट्टी भागातील दुकाने, व्यवसाय बंद असल्याने गावांतील सर्व व्यवहार ठप्प पडले हाेते. ‘एक दो एक दो वाढवण बंदर फेक दो’ अशा गगनभेदी घोषणा देत महिला, पुरुष आणि बच्चेकंपनी निषेधाचे फलक हातात घेऊन रस्त्यावर उतरले हाेते. तसेच जेएनपीटीचे श्राद्ध घालून आंदाेलनातील कार्यकर्त्यांनी मुंडण केले.
पहाटेपासूनच किनारपट्टीवरील चिंचणी, वरोर, वाढवण, धाकटी डहाणू, बाडापोखरण, तडियाळे, डहाणू, झाईपर्यंतच्या गावांत मच्छीमार्केट, मच्छी खरेदी-विक्री बंद ठेवण्यात आली होती. सर्वच गावांत बंदराला विराेध करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून मानवी साखळी उभारली होती. धाकटी डहाणू येथे मच्छीमारी बोटीही समुद्रात गेल्या नाहीत, तर वाढवण-टिघरेपाडा येथील मुंडेश्वरी देवालयासमोर शेकडो लोक रस्त्यावर उतरून त्यांनी बंदर उभारणाऱ्या जेएनपीटीचा अंत्यविधी करून निषेध केला. तसेच बाळकृष्ण पाटील, कमलेश किणी, सुनील राऊत आणि भुवनेश्वर पाटील यांनी मुंडण करून जेएनपीटीचे प्रतीकात्मक पिंडदान केले. याचवेळी येथील लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा मानवी साखळी करून उत्स्फूर्तपणे केलेले आंदोलन यशस्वी केले. या वेळी बंदरविराेधी आंदाेलनातून माघार न घेण्याची शपथही देवीसमोर घेण्यात आली.
विनाशकारी वाढवण बंदरामुळे आमचा मासेमारी व्यवसाय संपुष्टात येईल. शिवाय हिरवाईने नटलेला हा परिसर बेचिराख होईल. त्यामुळे वाढवण बंदर नकोच.
- नंदू विंदे, अध्यक्ष, धाकटी डहाणू मच्छीमार सोसायटी
आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी रिक्षा वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती.