डहाणू परिसरात अंधार उग्र आंदोलनाचा इशारा
By Admin | Published: June 21, 2016 12:57 AM2016-06-21T00:57:38+5:302016-06-21T00:57:38+5:30
डहाणू तालुक्याच्या ग्रामीण, शहरी भागांसह खेडोपाडयात गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले असतानाच रविवारी रात्री या परिसरात
डहाणू : डहाणू तालुक्याच्या ग्रामीण, शहरी भागांसह खेडोपाडयात गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले असतानाच रविवारी रात्री या परिसरात पावसाचे टिपटिप सुरू होताच डहाणू शहरासह सुमारे तीस ते चाळीस गावे अंधारात बुडाली. डहाणू, चिंचाजी, आगर या ठिकाणी अनेक वीजवाहिन्या तुटून पडल्या परतु, सुदैवाने कुठेही मनुष्यहानी झाली नाही. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंदभाई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने डहाणू वीज कार्यालयात पालघरचे कार्यकारी अभियंता डोंगरे यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली असून येत्या पंधरा दिवसांत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
डहाणूच्या बंदरपट्टी तसेच जंगलपट्टी भागातील चिंचाजी, परोर, वानगाव, साखरे, या फिडर अंतर्गत दिवसातून अनेक वेळा बिघाड होत असल्याने येथील सुमारे चाळीस ते पन्नास गावात एक तासही वीज पूरवठा सुरळीत राहत नसल्याने नागरिकांत महावितरणविरोधात कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील जुनाट विजेच्या तारा कमकुवत ट्रान्सफार्मर, तसेच गंजलेले वीजेचे खांब बदलण्यात येत नसल्याने पावसाळयात या परिसरात काळोख असतो. या बाबात सातत्याने तक्रारी करून देखील डहाणूच्या पश्चिमभागातील गावांत कोणतीच सुधारणा होत नसल्याने वीजेवर अवलंबून असलेल्या लघुउद्योजक, बागायतदार तसेच डायमेकर्सचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.
पावसाळयाच्या दिवसात वीज वाऱ्यासह पाऊस पडला की वीजपुरवठा खंडीत होतो. शिवाय अनेक ठिकाणी वीजेच्या तारा तुटून पडलेल्या असल्याने त्या दुरूस्ती करण्यासाठी वारंवार तक्रार करूनही कर्मचारी किंवा अधिकारी येत नाही. चिंचाजी गावांत तर डीओ. बरोबरच लहान मोठी दुरूस्ती गावातीलच तरूण मंडळी जीव धोक्यात घालून करीत असतात. वीजपुरवठा केव्हा सुरू होईल, असे अधिकारी तसेच सबस्टेशनला विचारल्यास ग्रामस्थांना उध्दट उत्तरे दिली जातात. (वार्ताहर)