डहाणूकरांच्या नशिबी वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:44 AM2017-12-30T02:44:33+5:302017-12-30T02:44:36+5:30
डहाणू/बोर्डी: ३१ डिसेंबर रविवारी आल्याने पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना डहाणूकरांना करावा लागणार आहे.
अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी: ३१ डिसेंबर रविवारी आल्याने पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना डहाणूकरांना करावा लागणार आहे. मात्र परगावातील पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थेबाबत स्थानिक प्रशासन टोलवा-टोलवी करीत असल्याने नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आहे.
या वर्षी शनिवारी आणि रविवारला जोडून नाताळ आल्याने सलग तीन दिवसाच्या सुट्टीमुळे डहाणूला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे डहाणू बोर्डी आणि डहाणू जव्हार या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली होती. येथील बोर्डी घोलवड, चिखले, नरपड आणि आगर या समुद्रकिनारी वाहन पार्किंगसाठी मुबलक जागा आहे. बोर्डी ग्रामपंचायतीने कर आकारून वाहनतळ उपलब्ध करून दिले आहे. मात्र पारनाका बीच शहरी भागात असल्याने तेथे पर्यटकांचे प्रमाण अधिक आहे. शिवाय या भागात बहुतेक रेस्टॉरंट आणि हॉटेल्स असून येथे येणारे परगावातील पर्यटक डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गालगतच्या शेजारी बेशिस्त पार्किंग करतात. त्यामुळे विशेषत: सायंकाळच्या वेळेस गर्दी वाढते. त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत असून वाहन पार्किंग तर सोडाच चालणेही कठीण होत असल्याने वाद-विवादाचे प्रसंग उद्भवतात. नगर पालिका क्षेत्रातील या हॉटेल्सचे बार पुन्हा सुरू झाल्यानंतर हे प्रमाण कमालीचे वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
परंतु या नियमबाहय पार्किंग व्यवस्थेविषयी हॉटेल्स मालकांना जाब विचारण्यात स्थानिक प्रशासन धजावताना दिसत नाही. या बाबत डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी डवले यांना विचारले असता, ही बाब आमच्या अखत्यारीत येत नसून वन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही जबाबदारी ढकलली. तर दुसरीकडे डहाणू सा. बा. विभागाने नियमांचा हवाला देत सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना न्याय देण्यासाठी आण ित्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना आखताना पोलिसांनाच कंबर कसावी लागणार आहे.
>कार्यक्रमांमुळे वाढणार गर्दी
३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या सेलिबे्रशनसाठी काही हॉटेल्सनी गल्ला जमविण्यासाठी कार्यक्र मांचे आयोजन केले असून तेथे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या वाहनांच्या गर्दीमुळे अपघात घडून निष्पाप जीव वाचवायचा असल्यास वाहतूक नियमनाचे गणित स्थानिक प्रशासनालाच सोडवावे लागणार आहे.