डहाणूच्या बाडापोखरण नळपाणी योजनेचे काम संथ
By Admin | Published: March 31, 2017 05:33 AM2017-03-31T05:33:33+5:302017-03-31T05:33:33+5:30
माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत तसेच आमदार आनंदभाई ठाकूर यांच्या प्रयत्नाने आघाडी सरकारच्या काळात मंजूर
शौकत शेख / डहाणू
माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत तसेच आमदार आनंदभाई ठाकूर यांच्या प्रयत्नाने आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या ४३ कोटींच्या बाडापोखरण नळ योजनेच्या नूतनीकरणाचे काम गेल्या अनेक महीन्यांपासून संथगतीने सुरु असल्याबद्दल पंचायत समितीने बोलविलेल्या बैठकीत नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप विभागीय अभियंता एस.एन.कसबे यांना चांगलेच धारेवर धरु न या योजनेचे काम मुदतवाढ देउनही का पूर्ण होत नाही असा सवाल ग्रामस्थांनी केला.
यावेळी पंचायत समिति सभापती चंद्रिका अंबात जिल्हा परिषद सदस्या व सभापती विनीता कोरे, पंचायत समिती सदस्य अमिता पाटील,निकिता चूरी,पंचायत समिती सदस्य वशीदास अंभिरे, चिंचणीचे सरपंच सुरेंद्र करवीर,वासगावचे सरपंच सतीश पाटील डहाणू पाणीपुरवठा विभागाचे उपअभीयंता आर.ए.पाटील आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
डहाणूच्या पश्चिम किनार पट्टीवरील २९ गावांना व ४ पाड्याना पुरेसे पाणी मिळावे या हेतूने मागील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने २००६ ला कालबाह्य झालेल्या बाडापोखरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी ४३ कोटी रु पयांचा निधी मंजूर केला होता. परंतु या योजनेचे काम ठरलेल्या मुदतीत न झाल्याने डहाणूच्या बंदरपट्टी भागात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.
येथील लोकांना या योजनेच्या अपुऱ्या पाण्यामुळे पंधरा पंधरा दिवस पाणी साठवून ते पिण्याची वेळ आली आहे त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे दरम्यान बुधवार रोजी पाणीपुरवठा उपअभियंता(डहाणू) यांनी बोलावलेल्या बैठकीत उपस्थित सरपंच उपसरपंचांनी व ग्रामस्थानी रौद्रवतार धारण केला. उप विभागीय अभियंता एस.एन.कसबे निरुत्तर झाल्याने लोकांचा रोष आधिकच वाढला
काम निकृष्ट, वंचित पाड्यांच्या समावेशाची मागणी
विशेष म्हणजे सध्या सुरु असलेल्या बाडापोखरण योजनेची जलवाहिनी टाकण्याचे काम निकृष्ट होत असून त्यामुळे अनेक ठिकाणी गळती होत असल्याचे स्थानिकांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या योजनेतून वंचित राहिलेल्या पाड्यांचाही तिच्यात समाविष्ट करण्याची मागणी सरपंच सुरेंद्र करवीर यांनी केली.