डहाणूतील उद्योगबंदी हटणार-जावडेकर
By admin | Published: July 28, 2015 11:30 PM2015-07-28T23:30:43+5:302015-07-28T23:30:43+5:30
डहाणूत नवीन उद्योगंधदे येऊन येथील लोकांना रोजगार मिळावा यासाठी डहाणू तालुक्यात जून १९९१ चे नोटिफिकेशन रद्द करण्याचे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर
डहाणू : डहाणूत नवीन उद्योगंधदे येऊन येथील लोकांना रोजगार मिळावा यासाठी डहाणू तालुक्यात जून १९९१ चे नोटिफिकेशन रद्द करण्याचे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आ. आनंद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाला दिल्लीत सोमवारी दिले.
डहाणू तालुक्यात जून १९९१ चे नोटिफिकेशन रद्द करावे व येथील हजारो आदिवासी व सर्वसामान्यांसाठी रोजगाराचे दार उघडावे या मागणीसाठी आ. आनंद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष राजेश पारेख, उद्योजक रविंद्र फाटक, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक मिहिर शाह यांच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची सोमवारी भेट देऊन चर्चा करून निवेदन सादर केले. यावेळी जावडेकरांने १९९१ चे नोटिफिकेशन रद्द करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
मुंबईपासून १२० कि. मी. अंतरावर तसेच महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवरील डहाणू तालुका पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असल्याचे ठरवून केंद्र शासनाने १९९१ मध्ये एका अधिसूचनेद्वारे या परिसरात उद्योगबंदी लादली. या जाचक अटीमुळे चोवीस वर्षात येथे एकही नवीन कारखाना सुरू झालेला नाही. हजारो सुशिक्षित बेकार तरूणांना रोजगारासाठी गुजरात राज्यात जावे लागते. लघुउद्योगांना बंदी असल्यामुळे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कामगारांच्या कुटूंबाची परिस्थिती बिकट झाली आहे. तर कायमस्वरूपी रोजगार मिळत नसल्याने स्थलांतर करावे लागते. (वार्ताहर)
डहाणूतील उद्योगबंदी बाबत जनमत जाणून घेण्यासाठी २००३ मध्ये केंद्रीय पथक डहाणूत आले होते. यावेळी डहाणू पंचायत समितीने आयोजित केलेल्या बैठकीत डहाणूतील शेतकरी, बागायतदार, लघु उद्योजक, तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते, पुढारी, कार्यकर्ते, पर्यावरणवादी नेत्यांचे एकमत न झाल्याने डहाणूच्या विकासाला मारक असलेली उद्योगबंदीची अधिसूचना तशीच जारी राहिली.