डहाणूच्या महालक्ष्मीची यात्रा आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:10 AM2019-04-19T00:10:40+5:302019-04-19T00:10:46+5:30
ठाणे, पालघर तसेच गुजरात राज्यातील लाखो भाविकांची माय असणाऱ्या डहाणुच्या महालक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवारीपासून सुरु होत असून
कासा : ठाणे, पालघर तसेच गुजरात राज्यातील लाखो भाविकांची माय असणाऱ्या डहाणुच्या महालक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवारीपासून सुरु होत असून सतत पंधरा दिवस चालणाºया या यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेची जय्यत तयारी असल्याची माहिती श्री महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी दिली.
सुरतमधील भाविक या देवीला आपली कुलस्वामीनी मानतात. यात्रा काळात दररोज येथे हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. महालक्ष्मी देवीला होमाच्या दिवशी जव्हारच्या राजघराण्याकडून प्रतिवर्षी खणा नारळांची ओटी भरून साडी चोळी अर्पण करून पाच मीटर लांब झेंडा चढविला जातो. ही प्रथा अजूनही परंपरेनुसार सुरू आहे. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होत असली तरी वर्षभर देवीचे बारसी, नवरात्र आदी उत्सव मोठ्या उत्साहात होतात. यात्रे दरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला व अष्टमीला दूसरा होम असतो. या शक्तीमातेला येथील आदिवासी समाजाबरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती समुदाय आपली कुलस्वामीनी मानतो. या मंदिरातील पुजारी आदिवासी समाजातील सातवी कुटूंबातील आहेत.
अशी आहे आख्यायिका
महालक्ष्मी मातेच्या अनेक आख्यायिका असून देवी डहाणूला स्थायिक कशी झाली. या बाबत असे सांगितले जाते की, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव्य करण्याची इच्छा झाली असता, वाटेत विवळवेढे डोंगरा दरम्यान जात असताना विश्रांतीसाठी देवी मुसल्या डोंगरा जवळ गेली. पुढे येथील कान्हा ठाकूर नावाच्या व्यक्तीला देवीने दृष्टांत दिला व पुजा करण्यास सांगितले. कान्हा ठाकूर मोठ्या श्रद्धेने पुजा करू लागले. त्यानंतर देवी डहाणूला विवळवेढे येथे स्थायिक झाल्याची नोंदी पुराणात आहेत. महालक्ष्मी देवीच्या प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात या बाबतचा मजकूर आहे.
>मध्यरात्रीचे ध्वजारोहण पाहण्यासाठी मार्गात भाविकांची गर्दी
मध्यरात्रीची ध्वजारोहणाची परंपरा चैत्र शुद्ध पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता पुजारी ध्वज, पुजेचे साहित्य नारळ घेऊन वेगाने पायथ्याच्या मंदिरापासून धावत निघतो. मध्यरात्री तीन वाजता तो डोंगरावर चढतो. तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो. ध्वज लावण्यास जातो व सकाळी परत येतो.हे दृश्य पाहण्यासाठी असंख्य भाविक मार्गात बसलेले असतात.त्यावेळी त्याच्या अंगात देवी संचारते असे म्हणतात. ध्वज लावण्याचे ठिकाण डोंगरावरील देवीच्या पूजेच्या स्थानापासून सहाशे फुट उंचीवर आहे. ध्वज लावण्यासाठी जो खांब असतो तो दर पाच वर्षांनी बदलला जातो. ध्वज लावण्याचे हे देवकार्य वाघाडी येथील मोरेश्वर सातवी परंपरेने करतात.प्रसिद्ध महालक्ष्मी मातेचे मुळ वास्तव्य तिथल्याच एका डोंगरावर आहे. परंतु या डोंगर माथ्यावर जाणारी वाट अत्यंत अडचणीची व धोकादायक असल्याने देवीचे पुजारी व भाविकांच्या सहकार्याने मंदिर डोंगर पायथ्याशी बांधण्यात आले. परंतु आता मात्र दानशूर भाविक नारायण जावरे यांच्या प्रयत्नाने देवीचे मंदिर मुळ वास्तव असलेल्या डोंगरावरही सुंदर बांधले आहे. त्यास ‘महालक्ष्मी गड’ म्हणून ओळखले जाते.