डहाणूची उद्योगबंदी विकासाला मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 03:03 AM2018-09-10T03:03:24+5:302018-09-10T03:03:26+5:30
आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यात गेल्या २८ वर्षांपासून केंद्र शासनाने येथे उद्योगबंदी लादल्याने डहाणूचा विकास खुंटला आहे.
- शौकत शेख
डहाणू : आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यात गेल्या २८ वर्षांपासून केंद्र शासनाने येथे उद्योगबंदी लादल्याने डहाणूचा विकास खुंटला आहे. ग्रीन झोन जाहीर केल्यामुळे डहाणूत उद्योग विकसित होऊ शकले नाहीत. विशेष म्हणजे एका बाजूला उद्योगबंदी, दुसऱ्या बाजूला उत्खननबंदी, यामुळे मोलमजुरी करणाºया आदिवासींबरोबरच सुशिक्षित बेरोजगारांची मुस्कटदाबी झाली आहे.
परिणामी, रोजगारासाठी दरवर्षी डहाणूतील हजारो आदिवासी कुटुंबांना मुंबई तसेच गुजरात राज्यात स्थलांतर करावे लागते. शिवाय, येथील उच्चशिक्षित तरुणवर्ग नोकरीसाठी मुंबई, बोईसर किंवा उमरगाव (गुजरात जीआयडीसी) येथे भटकत आहे. परंतु, जर केंद्र सरकारमुळेच वाढवणबंदर, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस, बुलेट ट्रेन अशा विविध मोठमोठ्या प्रकल्पांमुळे डहाणूतील ग्रीन झोन बाधित होणार असेल, तर ग्रीन झोन नक्की कशासाठी सरकारने लागू केला, असा प्रश्न सर्वसामान्य डहाणूकर विचारू लागले आहेत.
डहाणूत सन १९८९ ला ८२० हेक्टर खाजण जमिनीवर ५०० मेगावॅट वीजनिर्मिती करणारे थर्मल पॉवर स्टेशन आले. त्यानंतर, येथील पर्यावरणाचे संतुलन बिघडू नये, म्हणून केंद शासनाने सन १९९१ ला एका अधिसूचनेद्वारे डहाणूला ग्रीन झोन जाहीर केला. त्यात प्रदूषण करणाºया कारखान्यांना मज्जाव आहे.
डहाणू तालुक्यात कोणताही नवीन उद्योग सुरू करायचा असेल किंवा विद्यमान कारखान्यात फेरबदल करायचा असेल, तर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्रधिकरणाची मान्यता घ्यायला लागते. त्याच्या अटीशर्ती पाहता गेल्या २८ वर्षांत तालुक्यात साधी पिठाची गिरणीदेखील सुरू होऊ शकलेली नाही.
शासन एका बाजूला तालुक्यात उद्योगबंदी लादून नवीन कारखान्यांना बंदी घालत आहे, तर दुसºया बाजूला पर्यटनाला चालना मिळावी व त्यातून रोजगार निर्माण होईल, त्यासाठीदेखील पावले उचलत नसल्याने डहाणूतील जनता इकडे आड तिकडे विहीर या चक्र व्यूहात सापडली आहे.
दरम्यान, एकीकडे डोंगराळ प्रदेश आणि दुसरीकडे सागरकिनारा यामुळे तालुक्याला उत्तम नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. चिंचणीपासून थेट बोर्डीपर्यंतच्या विशाल समुद्रकिनाºयावर अनेक ठिकाणी पिकनिक स्पॉट तयार झाले आहेत. व्हॅकेशन तसेच सणासुदीच्या दिवसांत केवळ जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातून आणि परराज्यांतूनही पर्यटक येथे येत असतात. येथे वॉटर स्पोर्ट्ससारख्या पर्यटकांना आकर्षित करणाºया सुविधा आणण्याची गरज आहे. ते पाहता डहाणूत पर्यटनाच्या माध्यमातून ही रोजगारनिर्मिती उपलब्ध होईल असे तज्ञांचे मत आहे.
>गोव्याच्या धर्तीवर...
शासनाने नैसर्गिक विविधता लाभलेल्या डहाणू तालुक्यात पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी गोव्याच्या धर्तीवर येथील पर्यटनस्थळांबरोबरच धार्मिक स्थळे, हेरिटेजचाही समावेश करून विकास करण्याची गरज आहे.