डहाणूतील युवती महिनाभरापासून बेपत्ता, सुस्त पोलीस यंत्रणा : कुटुंबीयांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 01:57 AM2018-01-26T01:57:31+5:302018-01-26T01:57:59+5:30
श्रीमंताच्या घरच्या मुलीसाठी पोलीस रात्रंदिवस एक करुन तिचा शोध लावतात मग आमच्या मुलीचा का नाही
डहाणू : डहाणू येथील तरूणीला बेपत्ता होऊन एक महिना झाला. याबाबत डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील पोलीस प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याने डहाणू येथील मन्सूरी कुटूंबाकडून संताप व्यक्त केला आहे. तसेच जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तिचा शोध घेण्यासाठी तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यासाची मागणी केली आहे.
शबा मन्सूरी (२२) असे या युवतीचे नाव असून ती शहरातील नाहर नगर येथे राहत होती. ती गेल्या २४ डिसेंबर २०१७ रोजी घरच्या लोकांना काहीच न सांगता बाहेर पडली आहे. ती संध्याकाळपर्यंत घरी न आल्यानी कुटुंबियांनी मिसींगची तक्रार दाखल केली होती.
ती बंगळुरू येथील तरूणाच्या संपर्कात होती अशी माहिती मन्सुरी कुटुंबियांनी डहाणू पोलीसांना दिली आहे. मात्र, येवढे करुनही पोलीस यंत्रणा युवतीचा तपास करताना चाल ढकलपणा करीत असल्याचा आरोप मन्सूरी कुटुबिंयांनी केला आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी डहाणू येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. त्या मुलीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण जिल्हाभराच्या पोलीस यंत्रणेने रात्रंदिवस एक करून २४ तासात तिला सुखरुप परत आणले होते. श्रीमंताच्या घरच्या मुलीसाठी पोलीस रात्रंदिवस एक करुन तिचा शोध लावतात मग आमच्या मुलीचा का नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे.