जिल्ह्यात आज दहीहंडीचा थरार; तरुणाईचा उत्साह शिगेला, वरुणराजाची आळवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:18 AM2018-09-03T04:18:35+5:302018-09-03T04:18:45+5:30
रविवारची कृष्णजन्माष्टमी जिल्ह्यात उत्साहात पार पडली. परंतु सगळ्यांना ओढ लागली आहे ती सोमवारी रंगणाऱ्या दहीहंडीची. आगामी वर्षे निवडणुकांचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी व चमको नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंड्यांचे आयोजन केल्यामुळे त्यांची संख्या जशी वाढली आहे तसाच तरुणाईचा उत्साह देखील वाढला आहे.
पालघर : रविवारची कृष्णजन्माष्टमी जिल्ह्यात उत्साहात पार पडली. परंतु सगळ्यांना ओढ लागली आहे ती सोमवारी रंगणाऱ्या दहीहंडीची. आगामी वर्षे निवडणुकांचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी व चमको नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंड्यांचे आयोजन केल्यामुळे त्यांची संख्या जशी वाढली आहे तसाच तरुणाईचा उत्साह देखील वाढला आहे. घसघसीत रोख बक्षिसे, विम्याचे संरक्षण, उपचारांची सुविधा तसेच नाश्ता व भोजनाची सोय या बाबींमुळे स्त्री आणि पुरूष गोविंदा पथकांचा उत्साह यंदा प्रचंड वाढला आहे.
बोर्डी : कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाकरिता रविवार २ सप्टेंबर रोजी बाजारात लगबग दिसली. आगर गावच्या हनुमान मंदिरात श्री कृष्ण सप्ताहात १६८ तास अखंड कीर्तनाची परंपरा पंचाहत्तर वर्षापासून आजतागायत सुरु आहे.
आगर गावातील हनुमान मंदिरात १९३९ पासून श्री कृष्ण सप्ताह साजरा केला जातो. यंदाचे ७५ वे वर्ष आहे. पंचक्र ोशीतील सर्वात जुना व मानाचा हा उत्सव समाजला जातो. स्थानिक मच्छीमार समाज या करिता नारळी पौर्णिमेच्या समाप्तीनंतर रात्री कीर्तनाला प्रारंभ करून, अष्टमीच्या रात्रीपर्यंत सुमारे १६८ तास अखंड सुरु ठेवतात.
याकरिता गावातील श्री वैष्णव भजन मंडळी व श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ यांनी नियोजन करून कीर्तनाचा हा वारसा सुरु ठेवल्याची माहिती पुरोहित धनंजय पंडित यांनी दिली.
डहाणू शहर, नरपड, चिखले, घोलवड, रामपूर, बोर्डी, झाई आणि लगतच्या गावांमध्ये विविध समाज व मंडळांकडून हा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. अष्टमीच्या रात्री बारा वाजेनंतर बाळकृष्णाची मूर्ती फुलांनी सजवलेल्या पाळण्यात ठेऊन, पारंपरिक भजनं, गवळणी गाऊन साजरा होतो. गोपाळकाल्याला सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा सामूहिक कार्यक्र म आयोजित करून, वाडी-वस्तीतून पालखी फिरवली जाणार आहे. त्यानंतर समुद्रकिनारी विसर्जनाने उत्सवाची सांगता होईल. सोमवारच्या दहीहंडीचीही जोरदार तयारी आहे.
बोईसर : येथे ५५ सार्वजनिक ४५ खासगी दहीहंडी चे आयोजन करण्यात आले असून भारतीय जनता पार्टी व शिवसेने ची प्रत्येकी ७७७७७/- रुपये बक्षिसाची दहीहंडी असणंर आहे शिवसेनेचे या उत्सवाचे १० वे तर भाजपा चे हे पहिले वर्ष असून दोन्ही पक्षाची जोरात तयारी सुरू आहे.मनसे या वर्षी सामाजिक जाणिवेतून उत्सव साजरा न करता ५५ हजाराचा धनादेश केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून पालघर जिल्हाधिकार्याकडे सुपूर्द करणार असल्याचे मनसेचे उप जिल्हा प्रमुख समीर मोरे यांनी सांगितले. तर भाविकांची तारापूरच्या श्रीकृष्ण मंदिरात दर्शनास दिवसभर ये जा सुरू होती या मंदिरात रात्री १२ वाजता श्रीकृष्णजन्माचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.