डायमेकिंग ग्रामोद्योग ठप्प, ५० गावांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 03:25 AM2017-09-18T03:25:52+5:302017-09-18T03:25:56+5:30
पश्चिम किनारपट्टीवरील पन्नास ते साठ गावामध्ये सुरु असलेल्या भारनियमनामुळे घरोघरी चालणारा डायमेकिंग उद्योग ठप्प झाला आहे. यातुन दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याने सुमारे पंचवीस हजार कुशल-अकुशल कारागिरांबरोबरच या व्यवसायाशी संबंधित असलेल्या आदिवासी तरूणांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शौकत शेख ।
डहाणू: येथील पश्चिम किनारपट्टीवरील पन्नास ते साठ गावामध्ये सुरु असलेल्या भारनियमनामुळे घरोघरी चालणारा डायमेकिंग उद्योग ठप्प झाला आहे. यातुन दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याने सुमारे पंचवीस हजार कुशल-अकुशल कारागिरांबरोबरच या व्यवसायाशी संबंधित असलेल्या आदिवासी तरूणांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, जि.प. सदस्या विपूला सावे आदींच्या शिष्टमंडळाने १३ सप्टेंबर रोजी पालघर जिल्हा वीज महावितरण कंपनीचे अभियंता दिपक पाटील तसेच कार्यकारी अभियंता डोंगरे यांना भेटून अन्यायकारक भारनियमनामुळे शेती, बागायती बरोबरोबरच उद्योगांच्या नुकसानीची माहिती दिली.
स्त्रियांच्या सौंदर्य प्रसाधनातील नेकलेस, इयरिंग, मंगळसूत्र, चेन, ब्रेसलेट, अंगठी, आदि मुख्य अलंकार घडविण्यासाठी मुख्य साधन असलेल्या डाय (साचा) बनवण्याचा डायमेकिंग व्यवसाय भारनियमनामुळे संकटात सापडला आहे.
चिंचणी-तारापूर येथील डायला विशेषत: कोलकाता, बांगलादेश, नेपाळ, भूतान श्रींलंका, दूबई, मुंंबई, हैद्राबाद, कानपूर, बनारस, लखनौ, दिल्ली, बिहार येथून मोठया प्रमाणात मागणी असते.
>डहाणूच्या सागरी किनाºयावर वसलेल्या चिंचणी, वरोर, वाढवण, ओसार, डहाणूवाडी, इत्यादी पन्नास ते साठ गावांतील उच्चशिक्षीत तरूण सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता हस्तकौशल्य आणि अंगमेहनत या भांडवलावर अनेक पिढयांपासून वरील गावांत पारंपरिक डायमेकिंग व्यवसाय करीत आहे.