उपवन संरक्षक कार्यालयाने बांधले १५० बंधारे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 12:29 AM2019-12-10T00:29:36+5:302019-12-10T00:30:20+5:30
वन्यजीव आणि नागरिकांना मिळणार दिलासा
डहाणू: डहाणू उपवन संरक्षक कार्यालयातर्फे दहा वन परिक्षेत्राअंतर्गत लोकसहभागातून १५० वनराई बंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम यशस्वीपणे राबवली आहे. आगामी काळात त्यामुळे परिसरातील जलसाठा वाढून वन्यजीवांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी उपयोग होणार आहे.
पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन केल्यानंतर डहाणू उपवन संरक्षक अधिकारी विजय भिसे यांनी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाºया डहाणू, बोर्डी, कासा, उधवा, बोईसर, दहिसर, सफाळे, पालघर, मनोर आणि भाताने या वन परिक्षेत्रातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसह योजनाबद्धरित्या कार्यक्रमाचे आयोजन केले.
हा उपक्रम राबविताना लोकसहभाग केंद्रस्थानी होता. स्थानिकांच्या मदतीने भौगोलिक परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर उपक्रम राबवण्यात आला. त्यानुसार नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आणि पाणी असलेल्या ओहळावर रिकाम्या पोत्यांचा वापर करून त्यामध्ये पाण्याच्या प्रवाहासह आलेली माती भरण्यात आली. याकरिता वन कर्मचाºयांसह त्या-त्या भागातील महिला-पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शासकीय विभागातील कर्मचारी यांनी श्रमदानातून बंधारे बांधले. यावेळी मातीचा वापर करण्यात आल्याने, ओहळाचे खोलीकरण होऊन पुढील काळात पावसाचे अधिक पाणी अडवता येणार आहे. दरम्यान, दहा वनपरीक्षेत्रांपैकी पालघर येथे सर्वाधिक ४०, बोईसर ३८, उधवा २१, कासा १३ आणि दहिसर १० यांनी दोन अंकी आकडा गाठला असून अन्य ठिकाणी २८ असे एकूण १५० वनराई बंधारे बांधण्यात आले.
पालघर जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या रांगा असून पावसाळ्यात डोंगरावरून समुद्राकडे वाहून नेणारे अनेक ओहळ आहेत.
पावसाळा संपल्यानंतर त्यापैकी काही बंधारे हिवाळ्यातही वाहत असल्याने त्यावर बांध घातल्याने पाणी साठवता येणार आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढून विहिरी, कूपनलिकाद्वारे नागरिकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नाही. शिवाय गुरा-ढोरांप्रमाणेच रब्बी हंगामातील शेतीलाही त्याचा लाभ होणार आहे. येथील जंगलात असलेल्या बिबट्या, तरस, भेकर, रानडुकर अशा विविध वन्यजीव, पशू - पक्ष्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
काही वर्षांपासून ‘नाम’ आणि ‘पानी’ फाउंडेशनद्वारे राज्यातील विविध ठिकाणी वॉटरकप तसेच बंधारे बांधले गेले. सिनेकलावंतांनी त्यामध्ये पुढाकार घेतल्याने सामान्य नागरिकांना या योजनेची प्रेरणा मिळाली. त्यामुळे सर्वचस्तरातील नागरिक फावडा, घमेलं घेऊन वनकर्मचाºयांसह श्रमदानाकरिता एकवटले होते.
जिल्हाधिकाºयांच्या आवाहनानंतर या विभागाअंतर्गत १० वनपरीक्षेत्रात लोकसहभागाला महत्त्व देऊन श्रमदनातून १५० वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. त्याचा फायदा वन्यजीव आणि नागरिकांना शेती व पिण्याकरिता होणार आहे.
- विजय भिसे, उपवन संरक्षक, डहाणू