जिल्ह्यात सर्वत्र भातशेती नुकसान पंचनामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 11:02 PM2019-11-03T23:02:57+5:302019-11-03T23:03:27+5:30
वसईत ६० ते ७५ टक्के नुकसानीचा अंदाज : शेतकरी झाले हवालदिल; डहाणू तहसीलदार कार्यालयात विशेष कक्ष
पारोळ : वसई तालुक्यात परतीच्या पावसाने झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून सहा. कृषी अधिकारी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करताना दिसत आहेत. तालुक्यात साधारणपणे ६० ते ७५ टक्के भातशेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे.
यंदा वसई तालुक्यात साधारण पाच महिने पाऊस पडला असून आजही आभाळ भरलेच आहे. हंगामात ऐन कापणीच्या वेळेलाही पाऊस सुरूच राहिला. त्यामुळे लांबलेल्या कापण्यांमुळे शेतातील तयार पिकाच्या वजनदार कणसांवर पडणारे पाणी कणसांना अधिक वजनदार बनवत असल्याने उभी पिके आडवी पडली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून येथील बळीराजा हवालदिल झाला आहे. पावसामुळे भात पिकांचे झालेले नुकसान हे भाताला पुन्हा कोंब फुटल्याने, चिखलात दाणे नष्ट झाल्याने, तसेच पाण्यात जास्त वेळ राहून कुजल्याने झाले आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक हाती लागावे म्हणून शेतात ओले सुकलेले ज्या परिस्थितीत पीक आहे त्या परिस्थितीत त्याची कापणी करून अंगणात, ओट्यावर, घरात आणले, मात्र रचलेल्या उडव्यांमधील ओलाव्यामुळे भाताच्या भाऱ्यांत प्रचंड उष्णता निर्माण झाली आणि दाणे वाफल्यानेही नुकसान झाले आहे. भात नुकसानी बरोबरच झोडणीनंतर मजुरी खर्चाला हातभार लावणारे भात पिकाची पावली काळी पडल्याने त्याला ग्राहक नाही. तसेच पावसाच्या सुरवातीला वापरण्यात येणार गुरांचा चारा म्हणजेच पावली चारा म्हणून ठेवता येणार नसल्याने दोन्ही बाजूंनी शेतकºयांचे नुकसान आहे.
भातशेती नुकसानीची पाहणी आम्ही थेट शेतात जाऊन करत असून भात, पेंढा, व पावली असे नुकसान झाले आहे. कापणी लांबल्याने काही भातपीक हाती लागले तरी दळताना कणी किंवा पीठ होण्याची शक्यता असून जेमतेम २० ते २५ टक्के पीक कामी येऊ शकेल. सुरू असलेले पंचनामे आम्ही पुढील कारवाईसाठी लकरात लवकर वरिष्ठ पातळीवर पाठवणार आहोत
-अनिल मोरे, के टी संखे
कृषी सहाय्यक अधिकारी