नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 10:52 PM2019-11-05T22:52:11+5:302019-11-05T22:52:34+5:30
मीरा-भाईंदरमध्ये नुकसान : परतीच्या पावसाने पिके आडवी, शेतकरी हवालदिल, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा खरा प्रश्न
मीरा रोड : अवकाळी पावसामुळे मीरा- भार्इंदरमधील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना सरकारकडून पंचनामे सुरू झाले नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने दिल्या नंतर सोमवारपासून तलाठ्यांनी शेतीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे. अवकाळी पावसामुळे भार्इंदरच्या मुर्धा, राई, मोरवा, डोंगरी, तारोडी, उत्तन, पाली तर काशिमीरा येथील चेणे, काजूपडा, घोडबंदर, वरसावे, काशी आदी भागातील शेतकऱ्यांच्या भातपिकांचे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक पावसामुळे नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काहींनी तर कापणी करून ठेवलेलं भातपिक पावसामुळे कुजून गेले. भाजीपालाही पावसाने नासून गेला.
सर्वप्रथम ‘लोकमत’ ने मीरा भार्इंदरमधील शेतकºयांच्या व्यथा मांडत सरकारकडूनही नुकसान भरपाईसाठी शेतीचे पंचनामेच झाले नसल्याचे उघड केले होते. त्या नंतर खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन शेतकरी आणि मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्याची व तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली होती.
सोमवारपासून तलाठ्यांनी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली असल्याचे अपर तहसीलदार देशमुख यांनी सांगितले. राई, मुर्धा, मोरवा भागात तलाठी अनिता पाडवी यांनी, उत्तन - डोंगरी भागात तलाठी उत्तम शेडगे तर चेणे काशी भागात तलाठी अभिजित बोडके यांनी शेतकºयांना भेटून पिकांची पाहणी करत पंचनामे केले. शेती पिकवली त्या शेतकºयांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे सांगत महसूल विभागानेही नाहक तांत्रिक त्रुटी काढू नये अशी मागणी नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी उत्तन येथील पंचनाम्या दरम्यान केली.
भाजीपाला लागवड, पेरणी लांबणीवर
वासिंद : एकीकडे परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शेतातील ओलावा व भातशेतीचे कामेही अद्याप पूर्ण न झाल्याने भाजीपाला लागवड व कडधान्य पेरणी लांबणीवर गेली आहे.
ठाणे-पालघर जिल्ह्यात जवळजवळ ४० ते ४५ हजार हेक्टर क्षेत्रात हिवाळ््यात भाजीपाला लागवड व कडधान्य पेरणी केली जाते. यंदा अवकाळी पावसामुळे सध्याच्या भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीबरोरच शेतातील भातकापणी रखडली आहे. या भातकापणीची कामे उशिराने होऊन त्यातच या परतीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झालेला आहे.या परिस्थितीमुळे भाजीपाला लागवडीची व कडधान्य पेरणी कामे लांबणीवर आहेत. दोन्ही जिल्ह्यात शिमला मिरची, ज्वाला, आचारी मिरची, भेंडी, चवळी, कारली, काकडी, दुधी यासह पालक, मेथी, शेपू या भाजीपाला लागवडीसह मूग, हरभरा, वाल, तूर या कडधान्यांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र परतीच्या पावसामुळे भातशेतीच्या नुकसानीबरोबरच हंगामातील लागवडीवरही परिणाम झालेला आहे. सध्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेच आहे. मात्र त्याबरोबर लागवडीसाठी पेरलेली मिरची रोपटं व इतर लागवडीला उशीर होत असल्याने वेळेत लागवड होणार नसल्याने झालेल्या भातशेतीच्या बरोबर या भाजीपाला उत्पादनाच्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे, असे शेतकरी राजेश जाधव यांनी सांगितले.
जिल्हाधिकाºयांकडून पिकांची पाहणी
मुरबाड : मुरबाड तालुक्यात झालेल्या भातशेतीच्या नुकसानीची पाहणी व पंचनाम्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी मुरबाड तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. त्यांच्यासोबत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे, जिल्हा कृषी अधिकारी एम. डी. सावंत, तहसीलदार अमोल कदम उपस्थित होते. तालुक्यात सात हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावरील खरीप हंगामातील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून हे क्षेत्र दहा हजार हेक्टर पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे तहसीलदारांनी सांगितले . २०१७ मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी महसूल विभागाला निधी प्राप्त झाला आहे.
गुरांच्या चाºयाचाही प्रश्न ऐरणीवर
भातसानगर : सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने भातपिके पाण्यात कुजून शेतकºयांच्या जीवनमरणाचा प्रश्न जसा निर्माण झाला आहे तसाच गुरांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
शहापूर तालुक्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने सारी भातपिके पावसात कुजून गेल्यानंतर आता हाच चारा म्हणजेच या भाताचे सरलेही शेतातच कुजले असल्याने आता गुरांच्या चाºयाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शेतात तर काही प्रमाणात खळ््यात आणलेले भाताचे सरले हे पावसात भिजल्याने तो पेंढा कुजून गेला आहे. आजच्या स्थितीत ती गुरांना खाण्यास लायक नसल्याने त्यांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
माळरानातील गवतही पावसाने पार सडून गेले आहे. त्यामुळे आता या दोन्ही प्रकारच्या चाºयामुळे गुरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज शेतकºयांनी आपल्या खळ््यात व घरात ठेवलेले सरलेही आता बाहेर फेकून दिले आहेत. ते घरातच कुजल्याने कुबट येणारा वास व निर्माण झालेली प्रचंड हिट यामुळे तर शेतातील भात त्या भाºयासह कुजल्याने ते शेतातच टाकून देण्याची कधी नव्हे ती वेळ शेतकºयांवर आली आहे. तालुक्यात शेतीचे १०० टक्के नुकसान झाले असून तात्काळ मदत मिळण्याची मागणी केली जात आहेत.