भाऊबीजेच्या मुहूर्तावर एसटीसोबत ‘दमणगंगा’ही झाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 03:31 AM2017-10-22T03:31:51+5:302017-10-22T03:31:54+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकांनी संप मागे घेतल्यानंतर डहाणू बस आगारातून शनिवारी पहिली एसटी सकाळी ६ वाजता मार्गस्थ करण्यात आली.
डहाणू/बोर्डी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकांनी संप मागे घेतल्यानंतर डहाणू बस आगारातून शनिवारी पहिली एसटी सकाळी ६ वाजता मार्गस्थ करण्यात आली. या संपात आगारातील एकूण ३०० कर्मचारी सहभागी झाले होते, ते कामावर रु जू झाल्याची माहिती व्यवस्थापक मंजिरी बेहेरे यांनी दिली. याचवेळी गुजरात परिवहनची दमणगंगा बससेवाही सुरू झाल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला.
शहादा, बीड, कोल्हापूर, शिर्डी आदी लांब पल्ल्याच्या आठ गाड्या सोडण्यात आल्या. त्यानंतर तलासरी, बोर्डी, उंबरगाव, कोसबाड, तारापूर या स्थानिक बसेस धावण्यास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात संप मागे घेतल्याची माहिती प्रवाशांना नसल्याने तुरळक प्रतिसाद होता. मात्र प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडियामुळे बातमी समजल्यानंतर एसटी कर्मचारी कामावर रु जू झाले तसेच प्रवाशांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसून आले. दुपार सत्रात ३० गाड्या सोडण्यात आल्याचे आगार व्यवस्थापकांनी लोकमतला सांगितले.
हा संप मागे घेतल्यानंतर कर्मचाºयांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया असल्या तरी प्रवाशांना समाधानकारक सेवा देण्याची उर्मी त्यांच्यामध्ये दिसून आली.
देशभरात मोठ्या उत्साहात भाऊबीज साजरी होत असतांना महाराष्ट्र गुजरात सीमा भागात दमण गंगा ही गुजरात परिवहन मंडळाची बस प्रवाशांसाठी दुवा असते ही बससेवा प्रतिदिन दोन फेºया डहाणू आगारात करते. संपकाळात ही सेवा गुजरात राज्य मार्ग परिवहन मंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवली होती. एसटीचा संप संपताच तीदेखील सुरू झाली. त्यामुळे दोनही राज्यातील सीमावर्ती भागातल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला. सीमेलगतच्या गुजराती भाषिक लोकांमध्ये रोटीबेटी व्यवहार होत असल्याने भाऊबीजेकरिता बहिणींनी भावाचे घर गाठण्यासाठी याच बसेसच्या सेवेला प्राधान्य दिल्याने दमण गंगाच्या बसेस महाराष्टÑ व गुजरात मधील दुवा ठरली.
>डहाणू बस आगारातून ३०० कर्मचारी संपात सहभागी झाले होते, संप मिटल्यानंतर ते कामावर रु जू झाले. पहाटेपासून स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या आहेत. - मंजिरी बेहेरे,
व्यवस्थपक, डहाणू बस आगार