पारनाक्यावरील विजेचा धोकादायक खांब बदलला
By admin | Published: August 8, 2015 09:54 PM2015-08-08T21:54:24+5:302015-08-08T21:54:24+5:30
पारनाका येथील विजेचा गंजलेला लोखंडी खांब कोसळून अपघात होणार, अशी बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महावितरणने तत्काळ तो बदलून नवीन खांब रोवला आहे,
डहाणू : पारनाका येथील विजेचा गंजलेला लोखंडी खांब कोसळून अपघात होणार, अशी बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महावितरणने तत्काळ तो बदलून नवीन खांब रोवला आहे, तर ‘रस्त्यावरील बेसुमार झाडे छाटण्याची जबाबदारी कुणाची’ असे वृत्त लोकमतच्या अंकात प्रसिद्ध होताच पालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या चार-पाच दिवसांपासून रस्त्यावरील झाडे छाटण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. वीज महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आगार परिसरात विजेची तार तुटून मोटारसायकलने जाणाऱ्या हितेन कर्णावटला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर मोठी दुर्घटना पारनाका येथे होण्याची शक्यता होती. येथे ४० ते ५० वर्षांपूर्वी टाकण्यात आलेले विजेचे खांब जीर्ण झाले होते. मात्र, हा खांब बदलण्याऐवजी त्यास नायलॉनच्या दोरीने बांधून ठेवले होते.
डहाणू नगरपरिषद हद्दीत हजारो जुनी झाडे रस्त्याच्या दुतर्फा असून पावसाळ्याच्या दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ती अनेक ठिकाणी तुटून पडली होती. तर, काही दिवसांपूर्वी मसोली येथे मोटारसायकलने जाणाऱ्या राजेश प्रजापती (४०) यांच्या अंगावर नारळाचे झाड कोसळल्याने ते जागीच ठार झाले ॅहोते.याची दखल घेत पालिकेच्या आरोग्य विभागाने युद्धपातळीवर मसोली, सेंट मेरी, पारनाका या भागांतील रस्त्यावर झुकलेली झाडे छाटण्याचे काम सुरू केले आहे. (वार्ताहर)