दुर्मिळ मून मॉथ पतंगाचे बोर्डीत दर्शन; संवर्धनासाठी स्थानिकांनी करायला हवेत प्रयत्न, पर्यावरणवाद्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 03:54 AM2019-07-01T03:54:13+5:302019-07-01T03:54:40+5:30
पक्षी निरीक्षणाकरिता भावेश बाबरे हे वाणगाव परिसरात भटकंती करीत असताना, त्यांना या पतंगाचे दर्शन झाले.
- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : विविध रंगछटा असलेला आकर्षक मात्र दुर्मिळ असलेल्या मून मॉथ हा पतंग वाणगाव येथे चिंचणी येथील पक्षी निरीक्षक व वन्यजीव छायाचित्रकाराचा छंद जोपासणारे भावेश बाबरे यांना हा आढळून आला आहे. दरम्यान वर्षभरापूर्वी पश्चिम घाटाच्या कुशीतील अस्वाली जंगलात दुर्मिळ अटलास मॉथ हा पतंग आढळला होता. त्यामुळे या घटनेने आठवणींना उजाळा मिळाला आहे.
पक्षी निरीक्षणाकरिता भावेश बाबरे हे वाणगाव परिसरात भटकंती करीत असताना, त्यांना या पतंगाचे दर्शन झाले. पांढराशुभ्र रंग, लालसर पाय असलेले आणि डोक्यावर पानाच्या आकारातील तुरा तसेच पंख फिकट हिरवट रंगाचा हा देखणा पतंग होता अशी माहिती बाबरे यांनी दिली. त्याला पाहता क्षणीच फोटो काढण्याचा मोह आवरता न आल्याने त्याचे विविध अँगलने त्याने फोटो क्लिक केले. परिसरात मान्सूनच्या आगमनासह हा मून मॉथ स्थलांतर करून आला आहे. जिल्ह्यातील विविध भागात जंगल क्षेत्र असून पक्षी अभ्यासक आणि निरिक्षण आदींची आवड असलेले भटकंतीला बाहेर पडतात. त्यामुळे दुर्मिळ कीटक व पक्षी यांची माहिती या काळात समोर येते.
मून मॉथची वैशिष्ट्य:
- क्टियास लुना या शास्त्रीय नावाने ओळख.
- पंख सामान्यत: 4.5 इंच लांब, विस्तारल्यास 7 इंचा पेक्षा अधिक.
- मादी एका वेळी 200 ते 400 अंडी घालते.
जीवनमान फक्त दोन महिने किंवा त्या पेक्षाही कमी. स्थलांतर करून हा पतंग या भागात आला आहे. जिल्ह्यातील निसर्ग संपदा पाहता अनेक भागात त्याचा वावर असू शकतो. कोणत्याही पक्षी वा किटकाला ईजा पोहचू न देता, उलटपक्षी त्यांच्या संवर्धनाकरिता स्थानिकांनी पुढाकार घ्यायला हवा.
-भावेश बाबरे(पक्षी निरीक्षक व फोटोग्राफर)