साठीचे दशरथ बोराडे आकर्षण , कुस्त्यांनी सांगता, यंदा महिला मल्लांची अनुपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:14 AM2017-10-02T00:14:05+5:302017-10-02T00:14:08+5:30
जव्हारच्या वैभवशाली दरबारी दसºयांची सांगता दरवर्षीप्रमाणे कुस्त्यांच्या सामन्यांनी यंदाही झाली, याही वर्षी जुना राजवाडा येथील प्रांगणात नगर परिषदेने कुस्त्यांचे सामने आयेजित केले होते.
हुसेन मेमन,
जव्हार : जव्हारच्या वैभवशाली दरबारी दसºयांची सांगता दरवर्षीप्रमाणे कुस्त्यांच्या सामन्यांनी यंदाही झाली, याही वर्षी जुना राजवाडा येथील प्रांगणात नगर परिषदेने कुस्त्यांचे सामने आयेजित केले होते. रविवारी सकाळ पासून कुस्ती खेळण्यासाठी ५०० ते ५५० मल्लं आले होते. हजारोच्या संख्येने कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहन दिले.
पिंपळगाव-बहुला येथील शरद धात्रक यांना जव्हार केसरी घोषित करण्यात आले त्यांना ढाल, केशरी पट्टा व नऊ हजार रोख असे पारीतोषिक नगराध्यक्ष संदिप वैद्य यांच्या हस्ते देण्यात आले. तर उपविजेता ठरलेला मागील वर्षाचा जव्हार केसरी भाऊसाहेब मार्तडराव याला माजी नगराध्यक्ष रियाज मनियार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच सामन्यांत ६० वर्षीय मल्ल दशरथ बोराडे हे आकर्षण ठरले होते, त्यांनी आखाड्यात उतरून सामनाही जिंकला त्यावेळी कुस्तीप्रेमींनी जल्लोष केला. त्यांना दोन हजार पाचशे रुपयांचे पारितोषिक मिळाले.
जुन्या राजवड्यात रसिकांची मोठी गर्दी झाली होती. यावर्षी नगर पालिकेने कुस्तीपे्रमींसाठी चांगली आसन व्यवस्था केली होती, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त रसिक आल्यामुळे आजूबाजूच्या वाहनांवरती, गाडयांवरती, लगतच असलेल्या पिंपळाच्या झाडावरून लोक सामने बघत होते. रात्रभर तारपा नृत्य व ढोलनाच करून सैराट झालेल्या आदिवासी बांधवांनी पुन्हा कुस्त्या खेळण्यासाठी व पाहण्यासाठी जुना राजवाडा येथे मोठ्या संख्येने जमुन कुस्त्यांचा आनंद घेतला, या लढतींसाठी लांब लांबहून नामांकीत मल्ल आले होते, विशेषत: नाशिक जिल्हा नगर, पुणे, तसेच सोलापूर जिल्ह्यातून देखील मल्ल सहभागी झाले होते. सकाळ पासून सुरू झालेल्या कुस्त्या दुपार पर्यत सुरू होत्या. कुस्त्यांच्या दंगलींची प्रथा आजही तितक्याच उत्साहात नगर पालिकेच्या माध्यमातून चालू आहे. या वेळी नगराध्यक्ष संदिप वैद्य, माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, मुख्याधिकारी वैभव विधाते, कर्मचारी अखलाक कोतवाल, उत्तम शेवाळे, जगदीश मुकणे तसेच कुस्ती समेतीचे सभापती अशोक तांबोळी, उपसभापती हेमंत सहाणे, सुनिल ठमके, चिंत्रांगण घोलप, अनंता घोलप, संजय वनमाळी, विवेक शिरसाठ, मनिष घोलप, मंदार करमरकर, आदि उपस्थित होते. काही समिती सदस्यांनी पंचाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली.