देसलेची अपसंपदा करोडोंची, शिक्षक दलालाच्या भूमिकेत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:34 AM2019-01-09T04:34:28+5:302019-01-09T04:34:45+5:30
धुळ्यातील घरावर छापा : १४ लाखांची रोकड, दस्तऐवज हस्तगत, शोध जारीच
पालघर : जि.प.च्या माध्यमिक विभागाचा शिक्षणाधिकारी मोहन देसले याला १ लाखाची लाच घेतल्याप्रकरणी मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या धुळे येथील घराची झडती घेतली असता १४ लाख २० हजाराची रोकड व कोट्यवधीच्या मालमत्तांची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार शिक्षकाची नियमानुसार नियुक्ती झाल्याने त्यांना त्वरीत मान्यता देऊन पगार काढण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता देण्यासाठी जाहिरात दिल्याची प्रत आणि संबंधित कागदपत्रे आणून देण्याचा तगादा त्या शिक्षकाकडे लावला. अनेक फेºया मारून कंटाळलेल्या त्या शिक्षकाने बहुजन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कांबळे यांच्या मदतीने पालघरच्या लाचलुचपत विभागाचे कार्यालय गाठले.
या प्रकरणी शिक्षणाधिकारी यांनी केलेल्या ३ लाखाच्या लाचेची मागणी केल्यानंतर २ लाखांवर तडजोड झाली. २८ डिसेंबर २०१८ रोजी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली.
त्यानंतर त्यांच्या मधील संभाषण ऐकल्यावर देसले यांच्यावर चार वेळा ट्रॅप लावण्यात आला. मात्र, तो अयशस्वी झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्यांच्या कार्यालयामागे पैसे घेऊन बोलावल्याचा निरोप आला. पालघरमधील एका शिक्षकांच्या गाडीत सर्व बसलेले असतांना १ लाखाची रक्कम स्वीकारतांना देसले याला रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत विभागाने तात्काळ त्याच्या धुळे येथील बंगल्यावर छापा घातला. यावेळी त्यात १४ लाख २० हजाराची रोकड व कोट्यवधी रुपयांच्या १८ विविध प्रकारच्या मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली आहेत.
अनुकंपा भरती घोटाळा, सेवक समायोजन घोटाळा, बायोमेट्रीक मशिन घोटाळा, प्रयोगशाळा साहित्य खरेदी घोटाळा अशा घोटाळ्यांपाठोपाठ आता ही लाचखोरी घडल्याने जि.प. मध्ये नवीन वादळ उठले आहे. सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे.
शिक्षक दलालाच्या भूमिकेत? सोशल मिडियावर ट्रॉल
जिल्हापरिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाºयांना एक लाखाची लाच घेताना पकडल्याच्या प्रकरणात एका शिक्षकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. अशी जोरदार चर्चा पालघर मध्ये सुरू आहे. दरम्यान, शिक्षकच दलालांची भूमिका बजावत असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर होते आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात काही शिक्षक सध्या दलालांची अथवा कमिशन एजंटांची भूमिका बजावत असल्याचे बोलले जाते आहे.