पालघर जिल्ह्यात आंदोलनांनी गाजला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:24 AM2020-11-27T00:24:06+5:302020-11-27T00:24:27+5:30

मनसेचा वीजदरवाढीविरोधात राज्य सरकारविरुद्ध मोर्चा : माकपाचा केंद्र सरकारविरोधात रास्तारोको

Days of agitation in Palghar district | पालघर जिल्ह्यात आंदोलनांनी गाजला दिवस

पालघर जिल्ह्यात आंदोलनांनी गाजला दिवस

Next

पालघर : पालघर जिल्ह्यात विविध आंदोलनांमुळे गुरुवारचा दिवस गाजला. माक्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केंद्र सरकारविरोधात विविध मागण्यांसाठी ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन केले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाढीव वीज बिले माफ करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारविरोधात रणशिंग फुंकले.

महावितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली वाढीव वीजबिले माफ करण्यास नकार दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर पालघर येथेदेखील मनसेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणा देत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने वीजबिल माफ करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

वाढीव वीज दरवाढीविरोधात मनसेतर्फे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारीत पालघर, सफाळे, बोईसर आदी भागात काही मनसे पदाधिकाऱ्यांना आंदोलनाआधीच ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यासाठी तयारीत असलेल्या जुना पालघर परिसरातील मनसेच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर वीज नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने मीटर रीडिंग व वीज बिल वाटप केले. कोरोना काळात जनतेची आर्थिक गणिते कोलमडली असताना वाढीव वीज देयके म्हणजे जनतेच्या खिशावर भुर्दंड पडला आहे. एकीकडे जनता कोरोना संकटाचा सामना करीत असताना जनतेला आर्थिक दिलासा देण्याऐवजी आवाजवी वीज बिल देऊन त्यांची दिशाभूल करीत वीज दरवाढ करीत महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना भरमसाट वीजबिले पाठवली गेली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते, पण ऊर्जामंत्र्यांनीच स्वतः वीज बिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे सांगितले आहे. तसेच या भरमसाट बिलांची वसुली करण्याचेही जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून जनतेने ही वाढीव बिले भरू नयेत, असे आवाहन मनसेने केले आहे. मनसेच्या आंदोलनात जयेंद्र पाटील, भावेश चुरी, समीर मोरे, सुनील इंभाड, संदेश पडवळे, दिनेश गवई, मंगेश घरत, प्रवीण भोईर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. 

Web Title: Days of agitation in Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.